जायकवाडीच्या पाण्यावरून नगर, नाशिक, मराठवाडा संघर्ष तीव्र होणार

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी आडविणे हाच उपाय – इंजि. चकोर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या व गोदावरी नदीवर पैठण जवळ बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणामध्ये 15 ऑक्टोबर 2023 रोजी पाणीसाठा 62.2105 टी.एम.सी. (60.56%) व उपयुक्त पाणीसाठा 36.1443 टी.एम.सी.(47.14%) इतका असून गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठापेक्षा तो सुमारे 40 टी.एम.सी.(53% टक्के) कमी आहे. त्यामुळे वरील नमूद जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर मोठा परिणाम होणार असून पिण्याचे पाण्याचा सुद्धा काटकसरीने वापरावे लागणार आहे असे मत इंजि. हरिश्‍चंद्र र चकोर (जलसंपत्ती अभ्यासक व से. नि.अभियंता जलसंपदा विभाग, संगमनेर) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडले.


इंजि.चकोर म्हणाले की, जायकवाडी धरण बांधताना धरणस्थळी उपलब्ध होणारा येवा (ूशळश्रव-यील्ड ) लक्षात घेऊनच या धरणाचा एकुण पाणीसाठा 102.73 टी.एम.सी. निश्‍चित करण्यात आला. परंतु जायकवाडी धरणाच्या वरील भागामध्ये गोदावरी नदीच्या खोर्‍यात नाशिक व नगर जिल्ह्यात जनतेच्या मागणी व गरजेनुसार मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आली. त्यामुळे वरील भागाचा पाणी वापर जवळपास एकशे पंधरा टी.एम.सी. पर्यंत गेला. आणि तो भविष्यात 145 ते 150 टी.एम.सी. पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे जायकवाडी धरणात मोठी पाणी तूट सातत्याने यापुढे निर्माण झालेली पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने मराठवाडा विरुद्ध नाशिक -नगर हा संघर्ष सातत्याने उग्ररूप धारण करणार आहे. या सर्व बाबींच्या व अडचणींच्या पार्श्‍वभूमीवर सन 2005 मध्ये शासनाकडुन समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जायकवाडी धरणात दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी सुमारे 49.84 टी.एम.सी. म्हणजेच 65% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूह व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरण समूहांमधून जायकवाडी धरणामध्ये 65% टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडण्यात यावे आणि जायकवाडी धरणामध्ये दरवर्षीच्या 15 ऑक्टोबर रोजीचा उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी सिंचनासाठी विचारात घेतला जातो. सुमारे 49.84 टी.एम.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमतः करण्यात यावा व त्यासाठी वरील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे असे नमूद आहे. त्या अटीनुसारच वेळोवेळी जायकवाडी धरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील गोदावरी धरण समूहांमधून व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरण समूहांमधून जायकवाडीत पाणी सोडलेले आहे. मात्र यावर्षी जायकवाडी धरणामध्ये या वर्षीच्या 15 ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा 36.14 टी.एम.सी.(47.14%) टक्के इतका असून साधारणतः तो 13.70 टी.एम.सी. वापरण्यासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. जायकवाडी धरणात नाशिक- नगर जिल्ह्यातील धरणांमधून साधारणतः दहा ते अकरा टी.एम.सी. इतके पाणी सोडणे अपरिहार्य ठरणार आहे. त्या अनुषंगाने मराठवाडा जनतेकडुन या धरणात पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास जोरदार विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी जून अखेर जायकवाडी धरणामध्ये अंदाजे 20.3190 टी.एम.सी.(26.50%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत जायकवाडीत 24.3490 टी.एम.सी. इतक्या नवीन पाणी आवक झाली.

त्यामध्ये नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातून सुमारे 16.481 टी.एम.सी. पाणी गोदावरी नदीद्वारे जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातून देखील सुमारे 3.606 टी.एम.सी. पाणी जायकवाडीत वाहून गेले. जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जायकवाडीमधून कालवा पाणी वापर 3.1344 टी.एम.सी. इतका असून बिगर सिंचन उपसा सिंचन योजनांचा वापर हा 1.0958 टी.एम.सी. व जायकवाडी पाणी साठ्यातून जलसंपदा विभागाने शेती सिंचनासाठी मंजुरी दिलेल्या उपसा सिंचन योजनांचा वापर हा सुमारे 1.1491 टी.एम.सी. इतका झालेला आहे. जायकवाडी धरणातील उपरोक्त कालावधी मधील बाष्पीभवन जवळपास 2.3343 टी.एम.सी. इतका आहे. त्यामुळे जायकवाडीतील या वर्षीचा 1 जुन ते दि .15 ऑक्टोबर 2023 पर्यंत एकूण पाणी वापर अंदाजे 7.8496 टी.एम.सी. इतका झाला. या सर्व बाबींचा विचार करता वापरासाठी सद्यस्थितीमध्ये जायकवाडीत 47.14% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानुसार मराठवाड्यातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी जलसंपदा विभागास काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी कमतरता या प्रश्‍नावर मंजुर राज्य एकात्मिक जल आराखड्यानुसार पश्‍चिम वाहिनी नद्यांचे घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे सुमारे 115 टी.एम.सी. इतके अतिरिक्त पाणी गोदावरी नदी मध्ये अर्थात मराठवाड्याकडे वळविणे किती गरजेचे आहे याचा देखील शासनाने गांभीर्याने विचार करावा. सद्यस्थितीमध्ये पावसाचे प्रमाण हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे व सततच्या हवामान बदलामुळे कमी /अधिक झालेले दिसत असून नेहमी गोदावरी खोरे हे पाणी तुटीचे असलेले पहायला मिळते. याचा देखील युद्ध पातळीवर विचार करणे गरजेचे हआहे. सदरहू 115 टी.एम.सी. पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सिंचन योजनांची निर्मिती करावी लागणार असून नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रवाही पाणी वळण योजनांचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जवळपास 30 प्रवाही योजना मंजूर झाल्याचे ऐकिवात असून येत्या एक दोन वर्षात अंदाजे केवळ तीन टी.एम.सी. इतकेच पाणी वळविले जाणार असल्याने सद्यस्थितीत संभाव्य निर्माण झालेली सुमारे 25 ते 30 टी.एम.सी. इतकी पाणी तुट कशी भरून काढली जाईल व उर्वरित 93 टी.एम.सी. पाणी गोदावरी नदी खोर्‍यामध्ये आणण्यासाठी हे काम किती कालावधीत होईल याबाबत अंदाज वर्तविणे कठीण आहे. जवळपास 93 टी.एम.सी. पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे गोदावरी खोर्‍यात आणण्यासाठी अंदाजे 30 ते 35 हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज इंजि .हरिश्‍चंद्र चकोर यांनी व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे घाटमाथ्यावरील पाणी वळविणेचे काम हे जवळपास पूर्णतः डोंगराळ भागात,जंगल व अभयारण्य मधून करावे लागणार असून त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी व मोठी आर्थिक मदत देखील आवश्यक असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख