दिनेश फटांगरेला अर्ध्या चड्डीत पोलिसांनी केले गजाआड

0
90

बनावट नावाने अकाउंट तयार करून लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठीतांची बदनामी

माजी शिवसेना शहरप्रमुखाची आजी शहर प्रमुखांनी केली धुलाई


संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)
फेसबुकवर ‘पवन पाटील’ नावाचे फेक अकाउंट तयार करून लोकप्रतिनिधी, महिला नगरसेविका, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आणि पत्रकारांची देखील सातत्याने अश्लील व अपमानकारक भाषेत बदनामी करणाऱ्या वादग्रस्त दिनेश फटांगरे याला संगमनेर शहर पोलिसांनी अखेर ताब्यात घेऊन अर्ध्या चड्डीत गजाआड केले आहे आहे. विद्यमान शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी स्वतः या प्रकरणाचा छडा लावत माजी शहरप्रमुख असणाऱ्या दिनेश फटांगरेला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या कारवाईमुळे सोशल मीडियावर बदनामीचे सत्र चालवणाऱ्या प्रवृत्तींना मोठी चपराक बसली आहे.


दिनेश फटांगरे हा विकृत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, विरोध पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करीत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंतर त्याचे हे उद्योग थांबतील असे वाटत होते. परंतु तो शेवटी विकृत आणि नशेच्या आहारी गेला असल्याने तो सुधारला नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ‘पवन पाटील’ या बनावट फेसबुक अकाउंटवरून शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेर नगरपालिकेच्या विरोधी पक्ष नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी आणि त्यांच्या परिवाराबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकत होता. याआधीही त्याने पत्रकार, संपादक यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या. यानंतर शहरात तीव्र संताप व्यक्त होत होता.


या घटनांची गांभीर्याने दखल घेत शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी तातडीने या फेक अकाउंटची तांत्रिक माहिती आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हे अकाउंट नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या दिनेश फटांगरे नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी सहकाऱ्यांसह थेट दिनेश फटांगरे याचे घर गाठले. यावेळी तो घराच्या गच्चीवर मद्यप्राशन करत बसलेला आढळला. सूर्यवंशी यांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासला असता, त्याच मोबाईलमध्ये ‘पवन पाटील’ हे फेसबुक अकाउंट लॉगिन असल्याचे आणि त्यावरूनच बदनामीकारक पोस्ट केल्या जात असल्याचे रंगेहात उघड झाले. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि अर्ध्या चड्डीत थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले.

दिनेश फटांगरे या वादग्रस्त व्यक्तीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून कधी पोलीस अधीक्षक, तर कधी आजी-माजी आमदार, सत्ताधारी व विरोधकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारावर वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारांनाही त्याने धमकावले होते व त्यांच्याविरुद्धही अश्लील पोस्ट केल्या होत्या. यापूर्वीही त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ​सध्या संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी वादग्रस्त दिनेश फटांगरे याला चोप दिल्यानंतर दिनेश फटांगरे यांनी त्याच फेसबुक वर आमदार अमोल खताळ यांची बदनामी केली त्याबद्दल जाहीर माफीची पोस्ट देखील फेसबुक अकाउंट वर केलेली आहे या कारवाईची विनोद सूर्यवंशी यांनी योग्य चौकशी करून आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांचे देखील संगमनेर शहरात कौतुक होत आहे. एका माजी शहरप्रमुखाला विद्यमान शहरप्रमुखाने चांगलाच चोप दिल्याने या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा होत आहे. सोबतच सुर्यवंशी यांच्या तत्परतेचे कौतुक देखील होत आहे.

संगमनेर कायद्याचा बालेकिल्ला कधी

मार खाल्यानंतर आरोपींच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, पुणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. आरोपींवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी आपला धाक जिल्ह्यामध्ये ठेवणे खूप गरजेचे असते. संगमनेरच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. दिनेश फटांगरे सारखा आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अश्लील कमेंट करतो. त्याच्या पोस्ट सर्वत्र व्हायरल होतात. या फटांगरेने संगमनेर शहरामध्ये अनेकांचा मार खाल्ला आहे. त्याची यथेच्छ धुलाई झाली आहे. मात्र पोलिस स्वत: काहीच अॅक्शन घेताना दिसत नाहीत. या आरोपीवर अनेक केसेस दाखल झालेले असताना याच्या हातात मोबाईल जातोच कसा आणि तो सोशल मीडिया अकाऊंट वापरतोच कसे? गेल्या सहा महिन्यात या गुन्ह्यासाठी फटांगरेला सतत अटक होत आहे. तरी सुध्दा कायद्याचा धाक नसल्यामुळे तो पुन्हा पुन्हा हे करान आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आता तरी पोलिसांना कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here