अतिक्रमण हटाव की निवडक तोडफोड ?

0
83

निमाई स्वीट्सचे लाखोंचे नुकसान, व्यापाऱ्यांचा संताप

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी) संगमनेर शहरात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता कारवाईच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अतिक्रमण हटविण्याला कुणाचाही विरोध नसला, तरी अतिक्रमण नसलेल्या खासगी मालमत्तेवर बुलडोझर चालवून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या कारवाईत गणेशनगर येथील प्रसिद्ध निमाई स्वीट्स या दुकानाच्या दर्शनी भागावरील फ्लेक्स व इतर साहित्य तोडण्यात आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा दुकानाच्या संचालकांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित दुकान अतिक्रमणात नसून वाहतुकीलाही कोणताही अडथळा निर्माण करत नव्हते, असा त्यांचा दावा आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई हाती घेतली. मात्र कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.


व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेवर प्रत्यक्षात अतिक्रमण आहे की नाही, याची खातरजमा न करता कारवाई करण्यात आली. नियमांनुसार संबंधितांना नोटीस देऊन भूमिका मांडण्याची संधी देणे अपेक्षित असताना ती प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निमाई स्वीट्सच्या संचालकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत, “अतिक्रमण नसताना आमच्याच दुकानावर बुलडोझर कारवाई का करण्यात आली? इतर अनेक व्यावसायिक आस्थापनांवर अशी कारवाई का झाली नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे. कारवाईदरम्यान दुकानाच्या दर्शनी भागाचे व बोर्डाचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गालगत अनेक व्यावसायिक आस्थापना असूनही त्यांच्यावर कारवाई न करता केवळ निमाई स्वीट्सलाच लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करत, अतिक्रमण हटाव मोहिमेत सर्वांसाठी समान निकष आणि पारदर्शक प्रक्रिया अवलंबावी, तसेच झालेल्या नुकसानीची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here