आगार प्रमुख बदलीवर; संगमनेर बसस्थानक वाऱ्यावर!

0
42

गुंडांची दहशत, स्वच्छतेचा बोजवारा, प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

संगमनेर (युवावातार्ता प्रतिनिधी) नािशक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे आणि भव्य-दिव्य म्हणून ओळखले जाणारे संगमनेर बसस्थानक सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. आगार प्रमुख श्री. गुंड यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी केवळ तात्पुरता पदभार कनिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याने बसस्थानकात जबाबदार प्रशासनाचा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवासी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बसस्थानक परिसरात अल्पवयीन नशेडी तरुण आणि गुंडांच्या टोळ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. रात्रीच्या वेळी हातात धारदार शस्त्रे, लोखंडी कडे आणि काठ्या घेऊन काही टोळक्या प्रवाशांना धमकावत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू हिसकावून नेण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


गुरुवारी रात्रीही तीन ते चार जणांच्या टोळक्याने काही प्रवाशांना धमकावत पैसे आणि मोबाईल लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अशा घटना वारंवार घडत असूनही पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
बसस्थानकात पोलीस चौकी उभारण्यात आली असली, तरी दिवसाच्या वेळीही पोलीस किंवा सुरक्षारक्षक उपस्थित नसतात. रात्रीच्या वेळी तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याने चोरटे आणि गुंडांचे फावले आहे. खिसेकापू, लुटमार आणि प्रवाशांना धमकावण्याच्या घटना वाढत असल्याने रात्री बसस्थानकात थांबणे धोकादायक बनले आहे.
सरकारने सार्वजनिक स्वच्छतागृह मोफत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी संगमनेर बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडेही नसल्याने त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. हजारो प्रवासी आणि नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर करत असताना त्याची योग्य देखभाल होत नसल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


याशिवाय बसस्थानक परिसरात भिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून परिसरात अस्वच्छता आणि बकालपणा वाढल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणाही निकृष्ट आणि निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप होत असून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात ती अपयशी ठरत आहे.नवीन बसस्थानक उभारल्यानंतर येथे शेकडो व्यापारी गाळे सुरू झाले असून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र एवढ्या मोठ्या बसस्थानकात सुरक्षित वातावरण नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बसमधून उतरलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे घरी जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांनाही रात्रभर सुरक्षित थांबता येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे आधुनिक बसस्थानक आज असुरक्षित बनल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, पोलीस गस्त वाढविणे, कार्यक्षम सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहांची तातडीने देखभाल आणि पूर्णवेळ जबाबदार आगार प्रमुखाची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.
संगमनेरसारख्या महत्त्वाच्या शहरातील बसस्थानकाची ही दुरवस्था तातडीने दूर करून प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

पोलीस चौकी आहे… पण पोलीस कुठे?

तातडीच्या उपाययोजनांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here