सहकारातील ज्येष्ठ नेते केरूजी हरूजी उर्फ बाळासाहेब गुंजाळ पाटील यांचे निधन

0
16

संगमनेरच्या सहकार चळवळीचा आधारवड हरपला

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान देणारे बाळासाहेब गुंजाळ पाटील यांचे वयाच्या ९८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात शोककळा पसरली असून सहकार, शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील एका ज्येष्ठ मार्गदर्शकाचा आधार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 26 जून रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वर्गीय बाळासाहेब गुंजाळ पाटील हे संगमनेर पंचक्रोशीतील जुन्या काळातील प्रतिष्ठित जमीनदार, पाटील आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या सहवासात राहून त्यांनी संगमनेर तालुक्यात सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय शेतकी संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, संगमनेर विभाग सेवा सोसायटी, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, सह्याद्री शिक्षण संस्था यांसह अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणी, विस्तार आणि विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक संस्थांना आवश्यक असलेल्या जमिनी त्यांनी दान स्वरूपात उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि उदार स्वभावामुळे या संस्था आजही समाजाच्या विकासासाठी कार्यरत आहेत.

त्यांच्या निधनानंतर थोरात कारखान्याचे चेअरमन आणि मा. महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “बाळासाहेब गुंजाळ पाटील यांनी तब्बल ९८ वर्षांचे समृद्ध आणि आदर्श जीवन जगले. ते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी होते. शेतकी संघ, साखर कारखाना, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांमधून त्यांनी निष्ठेने काम केले. काटकसर, प्रामाणिकपणा आणि लोकहिताची जाणीव ही त्यांची जीवनमूल्ये होती. त्यांच्या निधनाने संगमनेर तालुक्याने सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.”

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हटले की, “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्वप्नातील सहकार चळवळ उभी करण्यात बाळासाहेब गुंजाळ यांचे मोलाचे योगदान राहिले. सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि ग्रामीण विकासाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी निःस्वार्थ भावनेने सहभाग नोंदविला. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.”

स्वर्गीय बाळासाहेब गुंजाळ हे धार्मिक विचारांचे, साधेपणा जपणारे आणि गरजूंच्या मदतीला नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. हरिश्चंद्र फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील गुंजाळ यांचे ते वडील होत.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, उद्योजक आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, साहेबराव नवले, अनिल देशमुख, ॲड. प्रतापराव थोरात, दुर्गाताई तांबे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते आणि संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय बाळासाहेब गुंजाळ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने सहकार, शिक्षण आणि समाजकारण क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नसल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here