
कोयत्याच्या धाकावर लूट
दैनिक युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील डी-मार्ट परिसरात मालवाहू वाहन चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी टोळीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील संघटित गुन्हेगारीसंदर्भातील कलम १११ लागू केले आहे. नव्या कायद्यानुसार करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून आरोपींना आता कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १.३० ते १.३५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शैलेश नारायण शेलार (वय ३४, रा. खैरेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) हे त्यांच्या मालवाहू पिकअप वाहनातून कंपनीचा माल घेऊन नाशिकहून चेन्नईकडे जात होते. यावेळी संगमनेर शहराजवळील सायखिंडी फाटा, डी-मार्ट परिसरात नाशिक-पुणे महामार्गावर सहा अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाच्या साहाय्याने पिकअप आडवी लावून त्यांना अडविले.
आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करत लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला. या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटली असून आरोपींमध्ये अक्षय दादा चव्हाण (वय २१, रा. अकोले नाका, संगमनेर), रोहित ऊर्फ कोकण भिकाजी शिंदे (वय २५), संदीप ऊर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २५, रा. आठरापगड, गुंजाळवाडी), आदित्य संजय शिंदे (वय २१, रा. आठरापगड, गुंजाळवाडी), अभिषेक अशोक लोंढे (वय २२) आणि साई रामपुरी गोसावी (रा. अकोले नाका, संगमनेर) यांचा समावेश आहे. यापैकी आरोपी क्रमांक १ ते ४ यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अक्षय चव्हाण हा टोळीप्रमुख असून त्याच्यासह साथीदारांविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर, गंभीर दुखापत, घरफोडी, चोरी, बेकायदेशीर जमाव, अनधिकृत प्रवेश आदी स्वरूपाचे तब्बल ३० गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर यांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ लागू करण्यासाठी प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आरोपींनी आर्थिक व भौतिक लाभ मिळविण्यासाठी संघटित टोळी स्थापन करून सातत्याने गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये केल्याचे निदर्शनास आणत कलम १११ लागू करण्यास मंजुरी दिली.
विशेष म्हणजे भारतीय न्याय संहिता २०२३ मध्ये संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम १११ हे मोक्का कायद्यातील तरतुदींप्रमाणेच कठोर स्वरूपाचे मानले जाते. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामूहिक सहभाग असलेल्या आरोपींवर हे कलम लावले जाऊ शकते. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३६४/२०२६ मध्ये यापूर्वी भारतीय न्याय संहिता कलम ३१०(१), ३१०(२) व ३१०(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये आता कलम १११ ची वाढ करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक सांवत व त्यांच्या पथकाने केली.























