वाढदिवसाचे विशेष औचित्य

आज गिरीशजी मालपाणी यांचा वाढदिवस…!
माझा आणि गिरीशभाऊंचा परिचय जरी जुना असला, तरी व्यवसाय, समाजकारण आणि नेतृत्वाच्या विविध पैलूंमधून त्यांना जवळून समजून घेण्याची खरी संधी मला लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दूरदृष्टी, निर्णयक्षमता, अथक परिश्रम आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही प्रत्येक वेळी नव्याने प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी जवळून अनुभवलेल्या उद्योजक, लीडर आणि समाजसेवक गिरीश मालपाणी यांच्या कार्याचा हा एक छोटासा आढावा
— सुदीप हासे (कार्यकारी संपादक)

३० मार्च हा दिवस संगमनेरच्या भूमीत जन्मलेल्या, उद्योगविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि समाजसेवेतून जनमानसात अढळ स्थान मिळवणाऱ्या माननीय गिरीशभाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसाचा विशेष दिवस आहे. एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज उद्योग, शिक्षण, ऊर्जा, पर्यटन, सहकार आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत व्यापक यश मिळवणारा ठरला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून मर्यादित नसून, ते एक दूरदर्शी लीडर, सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत.
शिक्षण व प्रारंभिक घडण
श्री. गिरीश मालपाणी हे महाराष्ट्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून सुपरिचित आहेत. संगमनेरमध्ये त्यांचे बालपण व्यावसायिक संस्कारातच घडले. त्यांनी पुण्यामध्ये बी.ई. केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन एमबीए ही पदवी संपादन केली. या शिक्षणामुळे त्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यवस्थापन कौशल्य, जागतिक दृष्टिकोन आणि व्यवसायातील आधुनिक तत्त्वांची सखोल जाण मिळाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक मालपाणी उद्योग समूहाची धुरा स्वीकारली आणि संचालक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली.

पारंपरिक व्यवसाय ते आधुनिक विस्तार

मालपाणी उद्योग समूहाची पायाभरणी त्यांच्या पूर्वजांनी केली होती. “गाय छाप जर्दा” हा ब्रँड हा या समूहाचा पाया असून आजही तो बाजारात विश्वासाचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर “अमृता चहा”, “माऊथ फ्रेशनर्स”, “बादशाह खैनी” यांसारखी विविध उत्पादने ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. गिरीशभाऊंनी पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग आणि मार्केटिंगची जोड देत व्यवसायाला नवे आयाम दिले.
मेहनत आणि ग्राउंड कनेक्ट
संगमनेरमधील टीम साऊथमध्ये नेऊन व्यवसायवृद्धीची कल्पना करणारे गिरीशभाऊ एकमेव उद्योजक असतील. प्रत्येक जिल्हा, तालुक्यातील छोट्याशा गावातील दुकानदारांशी आजही प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधणारे गिरीशभाऊ प्रचंड मेहनती आहेत. व्यावसायासाठी अनेक वेळा कंटाळवाणा असलेला प्रवास ते लीलया करतात आणि अगदी रात्री कितीही उशीरा आलेले गिरीशभाऊ दुसऱ्या दिवशी मीटिंगसाठी सकाळीच हजर असतात.

FMCG, बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील यश
त्यांच्या नेतृत्वाखाली मालपाणी समूहाने केवळ FMCG क्षेत्रातच नव्हे तर रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. पुणे आणि नाशिकबरोबरच देशात नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बांधकाम प्रकल्प राबवून समूहाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम व्यवसायातील पुरस्काराने समूहाला सन्मानित करण्यात आले, ही त्यांच्या गुणवत्तेची आणि नाविन्याची पावतीच आहे.त्यांच्या कल्पनेतून सुरू झालेली सरगम सुपर शॉपी याची विविध शहरात असलेली साखळी हळू हळू मोठा आकार घेत आहे

पर्यटन व मनोरंजन क्षेत्रातील योगदान
पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. शिर्डी आणि लोणावळा येथे उभारलेले “वेट-एन-जॉय” वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्क आज पर्यटकांसाठी प्रथम पसंतीची ठिकाणे ठरली आहेत. विशेष म्हणजे, शिर्डी येथे उभारलेले “साईतीर्थ स्पिरिच्युअल थीम पार्क” हे भारतातील पहिले धार्मिक थीम पार्क असून, ते देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. या प्रकल्पातून त्यांनी आध्यात्मिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. लोणावळा इमॅजिका नंतर अहमदाबाद येथेही वॉटर पार्क ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. नव्यानेच सुरू केलेल्या डेव्ह अँड बस्टर्सलाही नागरिकांची पोच पावती मिळत आहे.


ऊर्जा क्षेत्रातील मोठी झेप
ऊर्जा क्षेत्रातही गिरीशभाऊंनी दूरदृष्टी दाखवत अपारंपरिक उर्जा निर्मितीमध्ये मोठी गुंतवणूक केली. पवन ऊर्जा (Wind Mill) आणि सौर ऊर्जा (Solar Power) प्रकल्प विविध राज्यांत उभारून त्यांनी पर्यावरणपूरक विकासाला चालना दिली. देशातील पहिल्या बारा उद्योग समूहांमध्ये स्थान मिळवत आज समूहाने सुमारे 1000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा टप्पा गाठला आहे. ही केवळ उद्योगाची प्रगती नसून, देशाच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी दिलेले मोठे योगदान आहे.

हॉस्पिटॅलिटी आणि समर कॅम्प उपक्रम
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात “मालपाणी क्लब अॅण्ड रिसॉर्ट” आणि “मालपाणी पॅलेस” ही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १४ वर्षांपासून येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी उन्हाळी शिबिर (Malpani Summer Camp) आयोजित केले जाते. गिरीशभाऊ आणि सुनिताभाभी स्वत: या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सुमारे ७०० विद्यार्थी या कॅम्पमध्ये सहभागी होतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाचे गुण विकसित केले जातात.

शिक्षण क्षेत्रातील योगदान
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. मालपाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून संगमनेर आणि पुणे येथे ध्रुव ग्लोबल स्कूल चालवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. संगमनेरमधील मातोश्री रू. दा. मालपाणी विद्यालय ही संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. ब्ल्यू रिज पब्लिक स्कुल आणि अरीहंत एज्युकेशन फाउंडेशन च्या माध्यमातून शिक्षणाची मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ध्रुव ग्लोबल स्कुलची दुबई येथे असलेली ब्रांच जागतिक शिक्षण व्यवस्थेत मालपाणी परिवाराने टाकलेल्या पाऊलाचे उत्तम उदाहरण आहे.

सहकार क्षेत्रातील प्रभाव
सहकार क्षेत्रातही गिरीशभाऊंचा प्रभाव मोठा आहे. शारदा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते माजी अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती सातत्याने होत आहे. १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या या संस्थेचे ते आधारस्तंभ मानले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्रातही पारदर्शकता, विश्वास आणि विकास साध्य झाला आहे.

समाजसेवेची अखंड परंपरा
समाजसेवा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने केवळ १ रुपयात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये आजवर ११०० पेक्षा अधिक वधू-वरांचे विवाह संपन्न झाले आहेत. तसेच मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ५० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात आले असून, येथे केवळ १० रुपयांत रुग्णांची तपासणी केली जाते आणि सवलतीच्या दरात औषधे दिली जातात. हे कार्य त्यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे.

लायन्स चळवळीतले नेतृत्व
गिरीशभाऊ मालपाणी हे लायन्स चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. २००५ मध्ये त्यांनी लायन्स इंटरनॅशनलमध्ये प्रवेश केला आणि अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले.
लायन्स क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वातंत्र्योत्सव, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीरे, भव्य मॅरेथॉन स्पर्धा, उद्योजक आणि नागरिकांसाठी भव्य एक्स्पो, वंचित व्यक्तींना मदतीचा हात, शालेय विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप आदी प्रकल्प ते सतत राबवीत असतात.२०१४-१५ मध्ये ते व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले आणि २०१७-१८ मध्ये डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ (पुणे, नगर, नाशिक) चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा कार्यकाल लायन्स क्लबच्या विस्तारासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी विशेष लक्षात राहिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “Ambassador of Goodwill” हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला . तसेच ते लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचे संस्थापक अध्यक्ष असून लायन्स इंटरनॅशनलचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतातील लायन्स क्लबचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.

सहचारिणीचे मोलाचे योगदान
त्यांच्या या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी सौ. सुनिता मालपाणी यांची समर्थ साथ लाभली आहे. त्या डिस्ट्रीक्ट GAT कोऑर्डिनेटर, GST चेअरमन, रिजन चेअरमन आणि क्लबच्या अध्यक्षा म्हणूनही कार्यरत राहिल्या आहेत. भविष्यातील डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. या दाम्पत्याचा सामाजिक कार्यातील सहभाग हा समाजासाठी प्रेरणादायी आहे.

मॅनेजमेंट क्षेत्रातील अवलिया गिरिषभाऊ मालपाणी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत अनेकांनी उद्योग, समाजसेवा आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात नवे यश मिळवावे, हीच सदिच्छा.




















