निवेदनातून अन्यायकारक कारवाईचा आरोप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी गोरे साहेब व नगराध्यक्षा सौ. मैथिलीताई तांबे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगरपालिकेकडून राबविण्यात आलेली अतिक्रमण मोहीम एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी शहरातील इतर भागांमध्ये मात्र अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे स्थानिक दुकानदार, शेतकरी, भाजी विक्रेते, चहा टपरीधारक तसेच लघु व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला. अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, पार्किंग सुविधा नसलेल्या मोठ्या व्यावसायिक आस्थापनांबाबत प्रशासन सौम्य भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच बाहेरील राज्यांतून आलेल्या फेरीवाल्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नमूद करत, शहरातील विविध भागांमध्ये सायंकाळनंतर उघडपणे व्यवसाय करणार्या पाणीपुरी, आईस्क्रीम, फालुदा, मोमोज, आमलेट-पाव आदी विक्रेत्यांमुळे वाहतूक व शिस्तीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी अशा व्यवसायांमध्ये बेकायदेशीर प्रकारांना प्रशासनाची मुकसंमती असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. यात अतिक्रमण हटाव कारवाईमुळे बाधित व्यावसायिकांना तात्काळ पर्यायी व्यवस्था द्यावी. संपूर्ण संगमनेर शहरात समान व न्याय्य पद्धतीने अतिक्रमण कारवाई करावी. सर्व लघु व्यावसायिकांना नियोजित व कायमस्वरूपी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्थानिक नागरिकांसह नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.




















