
बंद पडणारे सिग्नल, तुटलेले गतीरोधक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
संगमनेर हे अहिल्या नगर जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि व्यापारी हालचाली यामुळे वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या वाढत्या वाहतुकीचे नियोजन आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांकडे संबंधित प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरत आहे. विशेषतः लाईट गेल्यानंतर बंद पडणारे वाहतूक सिग्नल, अनेक ठिकाणी तुटलेले डिव्हायडर, खराब झालेले व अपघाताला निमंत्रण देणारे प्लॅस्टिकचे गतीरोधक आणि त्यांची देखभाल न होणे यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

शहरातील नाशिक पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ, दिल्ली नाका, अकोले नाका येथे बसविण्यात आलेले वाहतूक सिग्नल वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाचे साधन आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की हे सिग्नल पूर्णपणे बंद पडतात. अनेक शहरांमध्ये सिग्नल यंत्रणेला बॅटरी बॅकअप किंवा सौरऊर्जेची जोड दिलेली असते, त्यामुळे वीज नसतानाही वाहतूक नियंत्रण सुरू राहते. संगमनेरमध्ये मात्र अशी व्यवस्था नसल्याने सिग्नल बंद पडताच या चौकांमध्ये गोंधळ उडतो. या सिग्नल जवळ कधीही वाहतूक पोलीस नसतात त्यामुळे वाहनचालक स्वतःच्या अंदाजाने वाहने चालवू लागतात आणि याच गोंधळातून अपघात घडतात.
विशेषतः नाशिक-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या चौकांमध्ये आणि गर्दीच्या वेळी सिग्नल बंद पडल्यास परिस्थिती अधिक गंभीर बनते. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि पादचारी यांना रस्ता ओलांडणे धोकादायक ठरते. अनेक वेळा किरकोळ अपघात घडूनही प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही.
याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांवरील डिव्हायडर तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी डिव्हायडरवरील रंग उडाले आहेत, तर काही ठिकाणी लोखंडी संरचना बाहेर आलेली दिसते. रात्रीच्या वेळी अशा डिव्हायडरची स्पष्ट दृश्यता नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने थेट डिव्हायडरवर आदळण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी नागरिकांनी सोयीसाठी डिव्हायडरमध्ये अनधिकृत मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे अचानक समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता वाढते.
गतीरोधकाची स्थितीही तितकीच चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी ते इतके झिजले आहेत की वाहनचालकांना त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. उलट काही ठिकाणी नियमबाह्य आणि अवैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले स्पीड ब्रेकर आहेत. अशा स्पीड ब्रेकरवरून भरधाव वाहन गेल्यास चालकाचे नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे. नवीन तंत्रज्ञान म्हणून वापरले प्लॅस्टिकचे गतीरोधक तर काही दिवसांतच तुटून पडतात. त्यातून खिळे देखील बाहेर येतात त्यामुळे दुचाकी अपघातग्रस्त होण्याची शक्यता वाढते.

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले परावर्तित फलक, दिशा दर्शक सूचना, झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी आणि रस्ते चिन्हे अनेक भागांमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहनचालकांना रस्त्यांचा योग्य अंदाज येत नाही. अपघातांचे प्रमाण वाढण्यामागे हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी रस्ते सुरक्षा अभियान राबविले जातात, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. मात्र नागरिकांकडून एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो की, जेव्हा मूलभूत सुविधा आणि सुरक्षित पायाभूत व्यवस्था उपलब्ध नाही, तेव्हा केवळ नागरिकांवरच जबाबदारी टाकून चालणार का? प्रशासनाने प्रथम रस्ते, सिग्नल आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी आणि वाहतूक विभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. एखादा डिव्हायडर तुटला किंवा सिग्नल बंद पडला तर त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित राहतो. परिणामी दुरुस्तीचे काम लांबणीवर पडते आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
या समस्येवर उपाय करायचा असेल तर काही तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत. सर्व सिग्नलना बॅटरी बॅकअप किंवा सौरऊर्जेची सुविधा देणे गरजेचे आहे. तुटलेले डिव्हायडर आणि स्पीड ब्रेकर तातडीने दुरुस्त करावेत. रस्ते सुरक्षा लेखापरीक्षण करून धोकादायक ठिकाणांची ओळख पटवावी. परावर्तित रंग, चेतावणी फलक आणि झेब्रा क्रॉसिंगचे नूतनीकरण करावे. तसेच नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.

संगमनेर हे प्रगत शहर म्हणून विकसित होत असताना वाहतूक सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी पूर्वतयारी करणे अधिक महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे बंद पडणारे सिग्नल, तुटलेले डिव्हायडर आणि खराब स्पीड ब्रेकर यांसारख्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देऊन प्रभावी कार्यवाही करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर केवळ चौकशा आणि आश्वासनांवरच समाधान मानावे लागेल, आणि त्याची किंमत निरपराध नागरिकांना आपल्या जीवाने मोजावी लागेल.





















