कारवाईवरून शहरात राजकीय – सामाजिक वाद; कारवाईत भेदभाव नको

संगमनेर (युवावार्ता संजय आहिरे)
संगमनेर शहर अतिक्रमणमुक्त करून वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्धार नगरपरिषद प्रशासनाने केला असून या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवरील भाजी विक्रेते व इतर अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या कारवाईला काही व्यापारी व भाजी विक्रेत्यांचा विरोध होत असल्याने अतिक्रमणाचा मुद्दा सध्या शहरात चांगलाच गाजू लागला आहे.
सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी शहरातील रस्ते आणि पदपथ केवळ वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनर्वसन करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे याही पुढाकार घेत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
या धोरणानुसार अकोले बायपास परिसरातील पेटीट विद्यालयाजवळील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन मेडीकव्हर हॉस्पिटलसमोरील जागेत करण्यात आले आहे. तसेच मालदाड रोडवरील भाजी विक्रेत्यांना महावितरण कंपनीच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक विक्रेत्यांनी या पुनर्वसनाला विरोध दर्शविला असून व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, या कारवाईवरून विरोधकांनीही नगरपरिषद प्रशासनावर टीकेची झोड उठविली आहे. शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमण हटविले जात असताना इतर अनेक प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ज्ञानमाता विद्यालय मार्ग तसेच जोर्वे नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. “पालिकेला ही अतिक्रमणे दिसत नाहीत का? केवळ एका भागातील अतिक्रमण हटवून शहराचा विकास होणार नाही. प्रशासनाने भेदभाव न करता सर्वच भागांतील अतिक्रमणे हटविण्याची हिम्मत दाखवावी,” असा सवाल स्थानिक नागरिक आणि अतिक्रमणधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका बाजूला शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे रस्ते मोकळे करण्यासाठी पालिका विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र दुसरीकडे काही घटक या मोहिमेला विरोध करत असून काहीजण प्रशासनाच्या भूमिकेतील विसंगतींकडे बोट दाखवत आहेत.
अतिक्रमण हटविण्याची मोहीम ही शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे मत एका गटाकडून व्यक्त होत असताना सर्वांसाठी समान निकष लागू करूनच कारवाई व्हावी, अशी मागणी दुसऱ्या गटाकडून होत आहे. परिणामी संगमनेरमधील अतिक्रमणाचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
आता नगरपरिषद प्रशासन शहरातील सर्वच भागांमध्ये एकसमान आणि निर्भीड कारवाई करते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा
संगमनेर नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे आणि रस्ते फेरीवाले मुक्त करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यानुसार शहरातील सर्वच भागात टप्प्याटप्प्याने ही कारवाई सुरू राहणार आहे. पेटीत विद्यालय जवळील ३२ भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन मेडीकव्हर हाॅस्पिटलसमोर करण्यात आले असून तेथे शेड बांधून दिले आहे, लवकर तेथील गटारीवल ढाबे टाकण्यात येणार आहे. तसेच नवीन नगर रोड येथे पालिका जागा विकत घेऊन तेथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणार आहे. सय्यद बाबा चौक येथील मटन मार्केट हटवून तेथे देखील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पालिका अतिक्रमण काढताना किंवा फेरीवाले मुक्त शहर करताना कुठलाही भेदभाव करत नाही, करणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

दयानंद गोरे
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद






















