शिवराज्याभिषेकाच्या थरारक सादरीकरणाने ‘जोश – द डान्स शो’ला संगमनेरकरांची दाद

0
86

लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचा स्वातंत्र्योत्सव उत्साहात

संगमनेर (प्रतिनिधी) : लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या स्वातंत्र्योत्सव उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘जोश : द डान्स शो’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध शाळा व नृत्यसंस्थांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नृत्याविष्कारांनी उपस्थित संगमनेरकरांची मने जिंकली. विशेषतः शिवराज्याभिषेकाचे रायगडच्या जय हनुमान कला मंचने केलेले सादरीकरण कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले. या सादरीकरणातून जणू छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष समोर उभे असल्याची अनुभूती उपस्थितांना आली आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार अमोलजी खताळ, नीलमताई खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माजी प्रांतपाल राजेशजी कोठावदे, रिजन चेअरपर्सन संदीपजी गोंदकर, झोन चेअरपर्सन चेतनजी भुतडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भाऊसाहेब लवांडे, महेश वैद्य, अनिल डोरवानी, विजय थोरात आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात माल्यार्पण व मशाल प्रज्वलनाने झाली. अध्यक्ष जितेश लोढा यांनी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. वंदे मातरम्, ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाला देशभक्तीपूर्ण वातावरण लाभले.


यावेळी बोलताना माजी प्रांतपाल राजेशजी कोठावदे, रिजन चेअरपर्सन संदीपजी गोंदकर आणि झोन चेअरपर्सन चेतनजी भुतडा यांनी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीशजी मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवासजी भंडारी यांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. सामाजिक बांधिलकीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची क्लबची परंपरा उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.


आमदार अमोलजी खताळ व नीलमताई खताळ यांनी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरचे कौतुक करताना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरमध्ये लायन्स क्लब नेहमीच अग्रेसर राहिला असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये देशप्रेम जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी हे मोठे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.


सुमारे 250 कलाकारांनी आपल्या नृत्याविष्कारातून भारताच्या संस्कृतीचा आणि शौर्याचा जागर यावेळी केला.  जय हनुमान कला मंच, रायगड यांच्या पोतराज, बाजी प्रभू देशपांडे, कृष्णा फ्युजन आणि विशेषतः शिवराज्याभिषेकाच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


याशिवाय मुद्रा डान्स अकॅडमी, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल, कृष्णा गोविंद डान्स अकॅडमी तसेच एक्स स्ट्रेंजर ग्रुप, लोणी यांनी विविध विषयांवरील नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रत्येक सादरीकरणामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कोरिओग्राफर्सचे योगदान दिसून आले. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कोरिओग्राफर्सही यावेळी उपस्थित होते.


संगमनेरमधील सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या २५ रिल स्टार्सचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक डान्स ग्रुप आणि शाळेला विशेष ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रकल्पाचे मार्गदर्शक गिरीश मालपाणी व श्रीनिवास भंडारी होते तर प्रकल्प प्रमुख म्हणून सुदीप हासे, डॉ. जितेंद्र पाटील व प्रशांत गुंजाळ यांनी काम बघितले. समन्वयक म्हणून कुलदीप कागडे यांनी काम पाहिले तर समितीमध्ये   सुनिता मालपाणी, अतुल अभंग, धनंजय धुमाळ, कल्याण कासट, व्यंकटेश अमृतवाड, नितीन नवले, हर्षल सोनवणे, सचिन गाडे, विनायक भोईर, अमोल भरीतकर, संतोष अभंग, कल्पेश मर्दा, किशोर कातोरे, अक्षय गोरले, स्वाती लोढा, अंजली पाटील, सुचित्रा कातोरे, अनन्या धुमाळ, मिनल अभंग, संगिता पुंड, सोनल गोरले,  निलम जोर्वेकर यांनी काम पाहिले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदीप हासे व डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले, तर प्रशांत गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष जितेश लोढा, सेक्रेटरी नम्रता अभंग, खजिनदार चंद्रशेखर गाडे तसेच प्रकल्प प्रमुख व संपूर्ण लायन्स टीमने विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here