रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेने भाविक मंत्रमुग्ध

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी)
अधिकमासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ, ओजस्वी आणि भावस्पर्शी रामकथेने गुंजाळवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे. रामकथेचा आध्यात्मिक गूढार्थ, भक्ती, ज्ञान, कर्म, वैराग्य आणि शरणागती यांचा सुंदर संगम उलगडत महाराजांनी उपस्थित हजारो भाविकांना रामनामाच्या अखंड चिंतनात रंगवून टाकले. अधिकमासातील आठव्या पर्वातील दुसऱ्या भागात भगवान श्रीरामांच्या जन्मप्रसंगाचे आणि रामनामाच्या महिम्याचे केलेले निरूपण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरले.स्वर्गीय जयवंतराव गुंजाळ व श्री बाळासाहेब गुंजाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुंजाळ मळा, गुंजाळवाडी येथे आयोजित या रामकथा सोहळ्यास दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. रामकथेच्या माध्यमातून भगवान श्रीरामांच्या चरित्रातील विविध प्रसंगांचा आध्यात्मिक अर्थ उलगडून सांगताना महाराजांनी भारतीय संस्कृती, धर्म आणि कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.रामकथा ही केवळ एका स्थळापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतवर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगताना महाराजांनी प्रयाग, कैलास, नीलगिरी आणि अयोध्या या पवित्र परंपरांचा उल्लेख केला. याज्ञवल्क्य ऋषी व भारद्वाज, भगवान शंकर व पार्वती माता, काकभुशुंडी व गरुड तसेच गोस्वामी तुलसीदास यांच्या माध्यमातून रामकथेचे महात्म्य मानवजातीपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

रामायणातील पात्रांचे आध्यात्मिक स्वरूप स्पष्ट करताना दशरथ म्हणजे वेद, कौसल्या म्हणजे ज्ञानशक्ती, सुमित्रा म्हणजे उपासना आणि कैकयी म्हणजे क्रियाशक्ती असल्याचे त्यांनी विवेचन केले. कथा केवळ ऐकून न थांबता तिचे चिंतन आणि आचरण जीवनात उतरविल्यासच तिचा खरा लाभ मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.राजा शीलनिधी, विश्वमोहिनी विवाह सोहळा तसेच सीतामाईंच्या जन्माची कथा सांगताना महाराजांच्या प्रभावी वाणीने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. जनकराजांच्या नांगराच्या फाळातून भूमीतून प्रकट झालेली भूमिकन्या पुढे जगन्माता जानकी म्हणून पूजली गेली, या प्रसंगाचे वर्णन ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत भक्तिभाव दाटून आला.राम-सीतेच्या विवाहापासून वनवास, रावणवध, अयोध्येला पुनरागमन आणि धर्मसंस्थापनेसाठी भगवान श्रीरामांनी केलेल्या अवतारकार्याचे सखोल विवेचन करताना त्यांनी धर्मरक्षणाचा संदेश दिला. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठीच भगवान अवतार धारण करतात, असे सांगत रामावतारामागील दैवी हेतू उलगडून दाखविला.

श्रावण बाळाच्या अद्वितीय मातृ-पितृभक्तीची कथा सांगताना वातावरण भावनिक झाले. माता-पित्यांना खांद्यावर घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या श्रावण बाळाच्या त्यागमय जीवनाचे वर्णन ऐकून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आजच्या पिढीने माता-पित्यांची सेवा आणि संस्कारांचे जतन करणे हीच खरी रामभक्ती असल्याचा संदेशही महाराजांनी दिला.कथेदरम्यान “राजाराम रामराम”, “सीताराम” आणि “जय श्रीराम”च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गगनगिरी महाराजांच्या कृपाछत्राखाली पार पडणाऱ्या या सोहळ्यात साधुसंतांची उपस्थिती लाभल्याने धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले. अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.भगवान श्रीरामांच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या वाणीतील भावमाधुर्याने जणू अयोध्येतील आनंदोत्सवच गुंजाळवाडीत साकार झाल्याची अनुभूती भाविकांना आली. कार्यक्रमाच्या शेवटी भगवान श्रीराम आणि प.पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आरतीने वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले. रामनामाच्या अखंड गजरात आणि भक्तीच्या अमृतधारेत चिंब भिजलेल्या भाविकांनी या दिव्य सोहळ्याचा अविस्मरणीय आध्यात्मिक आनंद अनुभवला.
स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रवचनाने हरिनाम सप्ताह भक्तिरसात न्हाऊन निघाला

परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संगमनेर परिसरात भक्ती आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक मासानिमित्त आयोजित या सप्ताहात जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष आध्यात्मिक उंची लाभली.यावेळी स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्येचा आणि कार्याचा गौरव करत धर्म, संस्कृती, कर्तव्य आणि भक्तीचे महत्त्व विशद केले. विज्ञानासोबत अध्यात्म आणि संस्कृतीची मुळे जपणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी निसर्ग संवर्धनाचाही संदेश दिला.स्वामीजींच्या विचारांनी भाविक भारावून गेले. “जय गगनगिरी महाराज” आणि हरिनामाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी दर्शन, प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणात आध्यात्मिक आनंद अनुभवला.























