९७ वर्षाची परंपरा जपत मोठ्या उत्साहाने यात्रेला सुरुवात
आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगत्या मंदिर परिसर
युवावार्ता (प्रतिनिधी)-
किशोर लहामगे – सिन्नरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या श्री क्षेत्र भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेची आज अत्यंत उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात सुरुवात झाली. भैरवनाथ रथ यात्रेचे हे ९७ व वर्ष आहे. दोन दिवसांपासून मंदिर परिसरातील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नेत्रदीपक.रोषणाई. बघण्यासाठी गावातील लोक गर्दी करत असतात. परंपरागत वापरण्यात आलेला सागवानी रथाचे सुशोभीकरण करण्यात येते. आयोजकांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी यात्रेच्या काही दिवस आधीपासून करण्यात येते. दिनांक ४ मंगळवारी पुरोहित संघातर्फे रुद्राभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समस्त महिला वर्ग रात्री उशिरा पर्यंत मिरवणूक मार्ग आणि मंदिर परिसरात मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. दिनांक ५ बुधवारी रोजी पहाटे ५पासून नागरिकांची वर्दळ सुरू होते. यानंतर भैरवनाथ मुकुटाचे महापूजेने श्री क्षेत्रपाल श्री भैरवनाथ महाराज यांच्या रथ यात्रेला सुरुवात झाली.बैल जोडीने हा रथ संपूर्ण शहरात पूर्वपर ठरलेल्या मार्गावरून ओढला जातो. रथ हाकण्याचा मान सालाबादप्रमाणे येथील पाचोरे घराण्याला दिला गेला.
रथापुढे भजनी मंडळे भजने गाऊन सेवा देत होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सोबत ट्रस्टी मंडळी सुद्धा उपस्थित होते.पंचक्रोशीतील बळीराजा आपली बैल जोडी घेऊन रथ ओढण्यासाठी आतुर झालेली दिसली. रथ मार्गावर जागोजागी पाण्याच्या सड्या बरोबरच फुलांचा सडा,भव्य नेत्रदीप क रांगोळी ,काढलेली दिसत होती. रथामागे गंगेचे पाणी आणलेल्या कावडी घेतलेल्यांची भली मोठी रांग लागलेली दिसते. तसेच कावडीघेतलेल्यांचे पाय पूजन करण्याकरता महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.पेढे ,गूळ खोबरे रेवडी या प्रकारचा प्रसाद वाटला जात होता.जागोजागी कावडी धारकांसाठी आणि नागरिकांसाठी शीतपेय आणि श्रीकृष्ण मंडळा तर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात येते. प्रत्येक जण या यात्रेत आपले शक्तीनुसार योगदान देण्यात अग्रेसर असतात. भैरवनाथ यात्रा सिन्नर शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक उत्सव पर्वणी असते. असे उत्सव खूप दुर्मिळ आणि अपवादात्मक बघायला मिळतात