डॉ. अमोल कोल्हेंसमोर छत्रपती शिवाजी महाराज साकारायला मिळणे हे माझे भाग्य – डॉ. सागर फापाळे

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून ज्या महानाट्याचा नावलौकिक सर्वदूर आहे असे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य नुकतेच संगमनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
माननीय महेंद्र वसंतराव महाडिक यांच्या लेखणीतून दिग्दर्शित केलेल्या या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होते. त्यांच्या समवेत अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश यात होता. अत्यंत गाजलेली शिवपुत्र संभाजी या मालिकेतील अनेक मोठ्या भूमिका साकारलेले कलाकार अर्थातच महेश कोकाटे, महेश तपकिरे स्नेहलता वसईकर, रमेश रोकडे, विश्वजीत फडते, राजन बाने अशा कलाकारांचा त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचा समावेश यामध्ये होता.
अशा या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले ही खर्‍या अर्थाने पूर्व जन्माची पुण्याई, आई-वडिल, गुरुजणांचे आशीर्वाद आणि आदरणीय महेंद्र दादा महाडिक यांनी ठेवलेला विश्वास असेच मी म्हणेल.
गेली बारा वर्षांपासून संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव युवक समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी साकारत असताना पाच वर्षापासून प्रा. प्रकाश कुमार वाघमारे दिग्दर्शित ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारून महाराजांचे विचार हे महाराष्ट्रभर पोहचवण्याचे काम करत आहे.


परंतू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सर्व सामान्यपर्यंत ज्यांनी आणला आणि गेली अनेक वर्षांपासून या भूमिकेसाठी मी ज्यांना प्रेरणास्थान म्हणून बघत आलो आहे ते डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्यासोबत मला शिवाजी महाराज म्हणून कधी भूमिका साकारता येईल का? असा अनेक वेळा मनात विचार येत असायचा.
हा विचार, हे स्वप्न फक्त आपल्या मनातच राहील असचं वाटायचं. परंतू योगायोग म्हणावं लागेल; संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आ. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य संगमनेर या ठिकाणी होणार आहे असे समजताच कुठेतरी मनात वाटायला लागलं की आपल्याला ही संधी आपल्या घरापर्यंत चालून आलेली आहे आणि ही गमावता कामा नये. या महानाट्याच्या निमित्ताने शिवपुत्र संभाजी या महानाट्याची डायरेक्शन टीम ही संगमनेर येथे आली असता माझी आणि त्यांची भेट झाली आणि महाराजांविषयी माझं प्रेम, माझा उत्साह बघून व मी आजपर्यंत केलेल्या महाराजांच्या भूमिकेतील काम याचा विचार करून क्षणात मला या भूमिकेसाठी महाडिक साहेबांनी होकार दर्शविला… यासाठी मार्गदर्शक आर. एम. कातोरे साहेबांसह आयोजक आ.बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या सर्वांचेच खूप मोलाचे सहकार्य लाभले.
अडीचशे ते तीनशे कलाकार असलेले महानाट्य डॉ अमोल कोल्हे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या महानाट्यात बर्‍याच वर्षांपासून काम करत आहेत. अशा या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वोच्च भूमिका ही आपल्या वाट्याला येणे हे ऐकूनच मी काही क्षण स्तब्ध झालो…. माझं धेय्य कुठेतरी पूर्ण होत होतं… आलेली संधी सोडायची नाही असा ठाम निर्धार करून मी तयारीला लागलो. फक्त पाच दिवस माझ्याकडे होते आणि माझी ही पहिलीच मालिका होती. आयुष्यातील सगळ्यात मोठ्या कठीण प्रसंग किंवा कठीण परीक्षेला मी सामोरे जाणार होतो. अक्षरशः या विचाराने ठीक अन्नही मला तिथून पुढे व्यवस्थितपणे जात नव्हतं. झोपही लागत नव्हती. रात्र आणि दिवस मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी काय करता येईल आपल्याला कसं यश मिळवता येईल याचाच पूर्णपणे विचार करत होतो….
माझे हॉस्पिटल माझे पेशंट हे सर्व बघून मला अचानक अशा भूमिकेसाठी सामोरे जाणं हे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि तेही पाच दिवसांमध्ये… परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळते, तेही एवढ्या मोठ्या रंगमंचावर आणि आपल्या संगमनेरकरांसमोर याच विचाराने मी पेटून उठत गेलो. या विचाराने मला खूप प्रेरणा मिळत होती. मलाही कळालं नाही की मी एवढ्या कमी कालावधीमध्ये तयारी करून एवढी चांगली भूमिका या ठिकाणी करेल.
परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे माझ्या रक्तात भिनलेले आहे आणि या भूमिकेसाठी मी काहीही करायला तयार असतो. गेली अनेक वर्षापासून माझा अनुभव मला सांगत होता त्यामुळे मी अजिबात गडबडून गेलो नाही आणि माझ्या कामाला सुरुवात केली या कामासाठी या महानाट्याचे सह दिग्दर्शक अभिजीत पवार त्याचप्रमाणे आपल्या संगमनेरचे दिग्गज कलाकार आणि या महानाट्यामध्ये जे गेले बारा वर्षांपासून काम करतात असे माझे मार्गदर्शक पंडित मामा दुधे, दीपक कानडे, दादू दुधे तसेच माझे कुटुंबीय मित्रपरिवार यांचे खूप सहकार्य लाभत गेले. खर्‍या अर्थाने खूप ताकद देण्याचे काम या सर्वांनी केलं आणि ही भूमिका यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज साकारत असताना महेंद्र दादा महाडिक यांनी ही भूमिका कशी उत्कृष्ट करता येईल यासाठी अनेक मोलाचे कानमंत्र दिले. याचा फायदा मला या महानाट्यात खूप चांगला झाला असं मी म्हणेल. त्यामुळेच मी या दिग्गज कलाकारांसोबत काम करतोय याची कोणतीही भीती कोणत्याही प्रकारचे दडपण माझ्यावर आलं नाही.
महाराजांचे कपडे अंगावर घातल्यानंतर मी फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे ह्याच भावनेत मी जगत होतो. त्यामुळे मला ही भूमिका लीलया पार पाडण्यास मदत झाली.
शिवरायांच्या विचाराने, व्यक्तिमत्त्वाने मला अंतरंगातून स्पर्श केला आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष जीवनातही मी महाराजांचे विचार अमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
भूमिकेत गेल्यानंतर हे शरीर माझं नसून शिवाजी महाराजांचे झालं आहे असंच मला नेहमी वाटत असत आणि त्या दृष्टीने मी माझा अभिनय करत असतो. जोपर्यंत माझा प्राण आहे तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेवढी चांगली करता येईल तेवढी चांगली करण्याचा प्रयत्न करत राहील आणि महाराजांचे विचार, इतिहास हा सर्वांसमोर कसा आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहील.
जय शिवराय
जय शंभुराजे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख