भांडण नेत्यांचे – रोख मात्र लेकरांवर
भांडण नेत्यांचे – रोख मात्र लेकरांवर
माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करणार असे सुतोवाच करताच आश्वीच्या कार्यक्रमात आ. बाळासाहेब थोरात यांनी लाडक्या बालकांचे छंद पालकांनी पुरविलेच पाहिजे या विधानाची चर्चा होत असतांना महसूल मंत्री विखे पाटलांनीही पलटवार केला. आमच्या लेकरांचे आम्ही बघू तुम्ही तर अख्खे घरदार राजकारणात आणले आहे. मुलगी, भाऊ, जावई राजकारणात आणणार्यांनी आमच्या मुलांची काळजी करू नये. या विधानांनी विधानसभेचे गांभीर्य वाढत असून लोकांची करमणूक होत आहे.
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दक्षिण नगरमध्ये खासदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढविण्याचा मनसुबा व्यक्त केला. मात्र त्यासाठी संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघाला प्राधान्य दिले. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर आजी – माजी महसूल मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मोठ्या घरचा मुलगा आहे, त्यात लाडाचा आहे त्यामुळे त्याचे लाड पुरवावेच लागतील. पक्षाने नाही तर पालकांनी पुरवावे असा टोला माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी लगावला. तर पलटवार करताना विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या मुलांचे लाड पुरवायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही तर मुलीसह सर्व नातलगांचे लाड पुरविले आहे असे म्हटले. यावरून संगमनेरच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आगामी विधानसभेला आता अवघ्या दोन तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. संगमनेरात आ. थोरातांविरोधात कोण? असा प्रश्न निर्माण होत असतानाच माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपण या स्पर्धेत इच्छुक असल्याचे सांगत संगमनेरच्या राजकारणात उडी घेतली. मात्र या उडीमुळे संगमनेरचे राजकारण ढवळून निघाले आहे. थोरात-विखे हे पारंपरिक विरोधक विधानसभेला एकमेकांविरुद्ध उभे राहिले तर ही लढत संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे. आ. थोरात यांनी लाडक्या मुलाचे लाड पुरवा असे सांगत एकप्रकारे या आव्हानाचे स्वागत केले आहे. तर विखेंनी देखील पक्षाने आदेश दिला तर आपली तयारी आहे असे सांगत आणखी रंग भरला आहे.
दरम्यान डॉ. सुजय विखे यांनी राहुरी तालुक्यातून शिवाजीराव कर्डिलेमुळे अप्रत्यक्षरित्या माघार घेतली असली तरी संगमनेरमध्ये मी नसलो तरी भाजपा ज्या उमेदवाराला संधी देईल त्यासाठी आपण काम करू असे सांगत यापुढे संगमनेरच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. तर थोरात हे ज्येष्ठ नेते असून संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी झोकून देऊन त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक निवडणूकीत त्यांचे मताधिक्य वाढत आहे.