मोकळ्या इमारती आणि जागा बनले गर्दुल्यांचे अड्डे

0
28

पोलीस आणि नगरपालीका प्रशासनापुढे अवैध व्यावसा यांचे आव्हान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून मोकळे भूखंड, पडके वाडे, दुर्लक्षित गार्डन, नदीकाठचे परिसर आणि ओसाड जागा या आता अवैध धंदे व गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनू लागल्या आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये दारूडे, गंजाडी, गर्दुल्ले, जुगारी आणि नशेखोर टोळक्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या टोळक्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

पोलिस प्रशासनाची प्राथमिकता अवैध धंदे बंद करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, महिला व मुलींचे संरक्षण करणे आणि शहरातील शांतता कायम राखणे ही असायला हवी. मात्र प्रत्यक्षात पोलिस यंत्रणा या मूलभूत जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, खुलेआम सुरू असलेले नशेचे प्रकार आणि संशयास्पद हालचाली यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
शहरातील अनेक ओसाड जागांवर रात्री उशिरापर्यंत टोळक्यांची गर्दी दिसून येते. काही ठिकाणी दारूच्या बाटल्या, नशेच्या गोळ्यांचे अवशेष, गांजाचे सेवन आणि जुगाराचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अनेक वेळा नशेच्या अवस्थेत काही जण सार्वजनिक ठिकाणी पडलेले दिसतात. यामुळे महिलांना, विद्यार्थिनींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः शहरातील पडके वाडे, बंद शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुर्लक्षित बागा आणि नदीकाठचे भाग हे समाजकंटकांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहेत. पोलिसांकडून या भागांमध्ये प्रभावी गस्त घातली जात नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे बोलले जात आहे. काही नागरिकांनी संबंधित भागांमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, नगरपालिकेने स्थापन केलेले रक्षक दल शहरातील वाहतूक, किरकोळ वाद आणि सार्वजनिक शिस्त राखण्यासाठी काही प्रमाणात चांगले काम करत असल्याचे दिसते. मात्र त्यांना कायदेशीर कारवाईचे अधिकार मर्यादित असल्याने गंभीर गुन्हेगारी रोखण्यात त्यांची क्षमता अपुरी पडत आहे. परिणामी गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणाच प्रभावी भूमिका बजावणे अपेक्षित असताना ती कुचकामी ठरत असल्याची टीका होत आहे.

नागरिकांच्या मते, शहरातील वाढत्या अवैध धंद्यांना राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण मिळत असल्यानेच कारवाई होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आता केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील मोकळे भूखंड, धोकादायक व पडके बांधकाम, बंद वादग्रस्त शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच अवैध धंद्यांसाठी वापरल्या जाणार्‍या ठिकाणांवर नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच पोलिस प्रशासनाने नियमित गस्त वाढवून अशा ठिकाणांची तपासणी मोहीम राबवावी, अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here