तरुणाविरोधात गुन्हा दाखल, ग्रामस्थांमध्ये संताप

युवावार्ता (प्रतिनिधी)
आश्वी – संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे गुरुवारी सकाळी एक अजब आणि धक्कादायक प्रकार घडला. गावातील एका तरुणाने चक्क ट्रॅक्टर घेऊन सरकारी रस्ताच नांगरून टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता प्रवरा डाव्या कालव्यालगत असल्याने सिंचन व्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर-जोर्वे-उंबरी बाळापूर-दाढ बुद्रुक-कोल्हार या महत्त्वाच्या जिल्हा मार्ग क्रमांक 21 वर महेश उर्फ छोट्या अनिल सरोदे याने ट्रॅक्टरच्या साह्याने थेट नांगर फिरवला.

काही वेळातच रस्त्याचा मोठा भाग उखडून निघाल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले. या प्रकारामुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही तर लगतच्या प्रवरा डाव्या कालव्याच्या माती भरावालाही धक्का बसला. त्यामुळे कालव्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राहाता कार्यालयातील कर्मचारी बबन ओव्हळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाणे येथे संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 324 (5), 285 तसेच महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी रस्ताच नांगरल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली असून, हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे करत आहेत.






















