हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती

0
25

तिगावकर संतप्त, ठप्प पाणी पुरवठ्यामुळे तिगाव संकटात; आंदोलनाचा इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील तिगाव गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला असून, तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांचे अक्षरशः हाल होत आहेत. गावातील विहिरी बोअरवेल कोरड्या पडल्याने महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तातडीने पर्यायी पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
तिगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (दि. 7) संगमनेर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, निळवंडे गावातील खंडोबा माळ परिसरातून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यालगत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेलेली आहे. त्या ठिकाणी पाण्याचा उद्भव उपलब्ध असून विद्युत पुरवठाही जवळ असल्याने तेथे तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पंप बसवून गावाला त्वरित पाणीपुरवठा करणे शक्य आहे. प्रशासनाने तत्काळ ही पर्यायी योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


दरम्यान, तिगाव गावासाठी असलेली तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. निंभाळे ते वाकण कोल्हेवाडी दरम्यान मुख्य पाइपलाइनच्या सुमारे 800 ते 900 मीटर भागाची दुरुस्ती रखडलेली असून, हे काम केवळ 15 दिवसांत पूर्ण होऊ शकते. मात्र वारंवार होणारे अडथळे आणि काम बंद पाडण्याच्या प्रकारांमुळे ही योजना अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून महिलांना डोक्यावर हंडे घेऊन मैलोनमैल पाणी आणावे लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून पाण्याअभावी नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक कुटुंबांना दिवसातून एकदाच पाणी मिळत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिस बंदोबस्तात रखडलेले पाइपलाइन दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करून बंद असलेली तळेगाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर गावातील अनेक ग्रामस्थांच्या सह्या असून प्रशासनाने आता तरी या गंभीर पाणीटंचाईकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी तिगावकरांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here