पुण्यापर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे

युवावार्ता (प्रतिनिधी)
श्रीरामपूर : लोणीच्या पिंपरी निर्मळ परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या अमानुष रॅकेटचा तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर व धक्कादायक वळण घेत आहे. मुलगा-मुलगी भेदाच्या विकृत मानसिकतेतून सुरू असलेल्या या काळ्या व्यवसायात डॉक्टर, एजंट आणि काही कुटुंबीयांचा थेट सहभाग समोर आल्याने समाजमन हादरले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 10 मेपर्यंत वाढ केली असून तपास यंत्रणांनी आता या रॅकेटची मुळे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात आतापर्यंत तब्बल 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या पतींचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका गोपनीय माहितीवरून झाली. पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कॅनॉल परिसरात एका बंद खोलीत गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लोणी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून धाड टाकली आणि या भीषण रॅकेटचा पर्दाफाश केला.
या कारवाईत सुरुवातीला नेवासा येथील डॉ. राहुल आबासाहेब भणगे आणि अभिजीत दिलीप भुसाळ यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून साडेचार लाख रुपये किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, रोख रक्कम तसेच तीन आलिशान चारचाकी वाहने असा तब्बल 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मशिनच्या माध्यमातून फिरत्या पद्धतीने गुप्त ठिकाणी गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पुढील चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे श्रीरामपूरपर्यंत पोहोचले. तपासात श्रीरामपूर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, तसेच प्रदीप ढगे आणि निलेश भवर या एजंट्सचा सहभाग समोर आला. पोलिसांनी तातडीने या तिघांनाही अटक केली. विशेष म्हणजे, डॉ. कुटे यांना बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली असून, लिंग निदानानंतर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या रॅकेटमध्ये वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन पुण्यातील दोन व्यक्तींकडून खरेदी करण्यात आले होते. या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली असून, त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध होती. एजंट प्रथम विविध भागांतून 8 ते 10 गर्भवती महिलांना संपर्क करून तयार करत असत. ठराविक संख्या पूर्ण झाल्यानंतर एक दिवस आणि वेळ निश्चित केली जात असे. महिलांना त्यांच्या पती किंवा नातेवाईकांसह बोलावले जाई. त्यानंतर प्रथम रोख रक्कम स्वीकारली जात असे. पुढे महिलांच्या नातेवाईकांना एका ठिकाणी थांबवून एजंट त्या महिलांना स्वतःच्या वाहनातून दुसर्या गुप्त ठिकाणी घेऊन जात असत. तिथे पोर्टेबल मशिनद्वारे गर्भलिंग निदान केले जाई आणि काही वेळानंतर महिलांना पुन्हा त्यांच्या नातेवाईकांकडे आणून सोडले जात असे.
या काळ्या व्यवहारात डॉक्टरला प्रत्येकी 10 हजार रुपये, तर एजंटला सुमारे 3 हजार रुपये मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अनेक महिलांची ओळख पटवली असून, त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, काही महिलांनी दिलेल्या जबाबातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गर्भलिंग निदानानंतर किमान तीन महिलांचे गर्भपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, हे गर्भपात अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्यात एजंट्सच्या मदतीने करण्यात आल्याचा आरोप आहे. या उघडकीमुळे केवळ बेकायदेशीर गर्भलिंग निदानच नव्हे, तर स्त्री भ्रूणहत्या आणि वैद्यकीय नैतिकतेचा घोर भंग करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यवसाय करणार्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलीस तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या अमानवी साखळीतील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



















