बारा वर्षांनंतर गाजलेल्या अपहरण प्रकरणाचा निकाल; सर्व आरोपी निर्दोष

0
11

साक्षीदार फिरले, पुरावे अपुरे; १२ वर्षांनंतर खटल्याचा शेवट

युवावार्ता (प्रतिनिधी)
तब्बल 12 वर्षे न्यायप्रविष्ट असलेल्या एका गाजलेल्या अपहरण व अत्याचार प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अखेर महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व सात आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (दि. 8 मे 2026) हा निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भैय्याजी बागडे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर त्यांना अ‍ॅड. सुजाता गोडसे यांनी सहकार्य केले. या खटल्याची पार्श्वभूमी 2014 सालातील असून, त्यावेळी पीडित मुलगी 17 वर्षे 6 महिने वयाची होती.

फिर्यादी पक्षाच्या आरोपानुसार, राहुल बागडे याने मुलीला लग्नाचे आणि सुखी संसाराचे आमिष दाखवून पळवून नेले होते. या काळात पीडिता गर्भवती राहिली होती. ऑगस्ट 2015 मध्ये ती पुन्हा पालकांकडे परतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात भारतीय दंड विधानातील कलम 376 (2)(एन), 363, 366(अ), 34 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने पीडित मुलगी, तिचे आई-वडील आणि वैद्यकीय अधिकारी अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मात्र, प्रत्यक्ष न्यायालयीन सुनावणीत या प्रकरणाला मोठे नाट्यमय वळण मिळाले. पीडित मुलीने न्यायालयात दिलेल्या साक्षीत आरोपीला आपण ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच आपल्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट करत तिने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत दिलेला पूर्वीचा जबाबही फेटाळून लावला. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या आई-वडिलांनीही न्यायालयात आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा दिला नाही. उलट, मुलीचे अपहरण झाल्याचा आरोपच त्यांनी नाकारला.

न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले की, केवळ साक्षीदारांनी फिरवलेली भूमिका नव्हे, तर सादर करण्यात आलेला डीएनए अहवालही आरोपींना दोषी ठरविण्यासाठी पुरेसा ठरत नाही. रक्ताचे नमुने कोणाच्या उपस्थितीत घेण्यात आले, ते प्रत्यक्षात पीडित व आरोपींचेच होते का, याबाबत ठोस पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याने डीएनए चाचणीचा निष्कर्ष ग्राह्य धरता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालानुसार राहुल बागडे, इंदिरा बागडे, वनिता बागडे, नरेंद्र गजभिये, प्रगती गजभिये आणि नीता पानतावणे (सर्व रा. नागपूर) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, आरोपी भैय्याजी बागडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावरील खटला यापूर्वीच बंद करण्यात आला होता. मुख्य आरोपी राहुल बागडे हा सध्या कारागृहात होता.
न्यायालयाने या निकालासोबतच सर्व आरोपींचे जामीन रोखे रद्द करण्याचे तसेच मुदत संपल्यानंतर या प्रकरणातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेशही दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here