- ज्येष्ठ पत्रकार – मधुकर भावे
- मो. 9869239977
शनिवारी शेवटच्या टप्प्यातील निवडणूकीनंतर रविवारी सर्व वाहिन्यांनी भाजपाला ३५० च्या पुढे जागा देवून टाकल्या. गेले दहा वर्षे बहुसंख्य वाहिन्यांची नावे वेगळी वेगळी असली तरी, सर्व वािहन्यांचे बाह्य स्वरूप ‘बीजेपी माझा’ असेच आहे. निवडणुकीचा निकाल लागला या शब्दातील ‘निकाल लागला’ हा शब्द भाजपासाठी आहे. देशपातळीवरही आणि महाराष्ट्राच्या पातळीवरही! लगेच वाहिन्यांचे सूर बदलले… पंतप्रधानांचा सूर बदलला. तरीही ‘भाजपा बहुमत मिळालेले नाही’, असे एकाही वृत्तपत्राने लिहिले नाही. एन.डी.ए. च्या २९२ आकड्याचाच गजर सुरू आहे. पंतप्रधानांच्या भाषणाचाही आता एन.डी.ए.चा जप सुरू झालेला आहे. ‘भाजपा’ हा शब्द त्यांनी वगळलेला आहे. आता ध्यान करतानासुद्धा ‘एन.डी.ए.’ हाच ध्यानाचा शब्द असेल. ‘चारसौ पार’ वाले २४१ वर अटकले आहेत. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकणारे… फक्त १८ जागांवर अडकले आहेत. त्या १८ मध्ये भाजपाच्या नेमक्या किती? मुंबईत काय फजिती झाली…
मुबई भाजपाचे अध्यक्ष कोणी आशिष शेलार नावाचे आहेत… त्यांनी जाहीर केले होते की, ‘महाविकास आघाडीला एकूण १८ जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईन.’ त्यांनी राजकारण सोडले की नाही, हे अजून जाहीर झालेले नाही.
महाविकास आघाडी ३० जागा िजंकणार, असे दिसत होते, परंतु भाजपा नेते हवेत होेते. ते सगळे आता जमिनीवर आले.
महाराष्ट्रात भाजपाचे हे जे काही झाले, त्यामुळे सुतकात गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना एक गोष्ट आता स्पष्टपणे सांगितली पाहिजे, या सगळ्या अनर्थाचे पहिले खलनायक श्रीमान देवेंद्र गंगाधार फडणवीस नावाचे गृहस्थ आहेत. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची तोडफोड करण्यासाठी छिन्ही-हातोडा घेवून तेच बसले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे गटार त्यांच्याच पुढाकाराखाली झाली. त्याला मोदी-शहा यांचा पूर्ण पाठींबा होता. हे का घडले…? कारण महाराष्ट्रात भाजपाला ४०-४५ जागा जिंकून देणारा एकही नेता महाराष्ट्रात राज्य पातळीवर भाजपाकडे नाही. आता या निवडणुकीने आणखी एक गोष्ट स्पस्ट केली की, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्रीसुद्धा महाराष्ट्र जिंकून देवू शकत नाहीत. जिथं-जिथं मोदींच्या सभा झाल्या तिथं-तिथं भाजपा आणि युतीचे उमेदवार पडले. पण महाराष्ट्रात हे घाणेरडे राजकारण फडणवीसांनी सुरू केले, हे आता इितहासात कायमचे नोंदले गेलेले आहे. या माणसाला अकारण मोठे केले गेले. ५ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बहुमत मिळवून देता आले नव्हते. भाजपाच्या १७ जागा कमी झाल्या होत्या.
या फोडाफोडीचे मुखीया फडणवीस झाले. मग प्रथम एकनाथ शिंदे यांना फोडले…. ते फुटून आल्यावर फडणवीसांना वाटले होते, आपल्याला मुख्यमंत्री करतील पण, अमित शहांनी डाव पलटवला आणि मराठा असलेल्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले. नंतर विधानसभेच्या दोन पोट निवडणुका लागल्या. एक अंधेरीची पोटनिवडणूक आणि दुसरी कसबा येथील पोट निवडणूक. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालेले असताना, त्यांनी एकही निवडणूक लढवली नाही. अंधेरीची निवडणूक मशाल चिन्हावर शिवसेनेने जिंकली. कसब्याची निवडणूक काँग्रेसचे धंगेकरनी जिंकली. त्या निवडणुकीपूर्वी ३ रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस- तेव्हा दादा फुटलेले नव्हते.- पुण्यात बसून होते. तरीही पोटनिवडणूक हरले. मग दादांना फोडण्याची याेजना सुरू झाली. मग पंतप्रधानांनी ‘एन.सी.पी.’ची व्याख्या केली. लगेच दादा फुटले… त्यांना दुसरे उपमुख्यमंत्री केले. जे फुटले नाहीत, त्यांच्या मागे चौकशा लावल्या. काहीजणांना तुरुंगात टाकले. या सगळ्यामागे फडणवीस होते, हे आता महराष्ट्राला कळून चुकले आहे. हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. यशवंतराव चव्हाण असतील… वसंतराव नाईक असतील… वसंतदादा असतील… शरद पवार असतील… विलासराव असतील… त्या त्या वेळच्या सत्तेतील माणसांनी असे घाणेरडे राजकारण केले नव्हते. तेव्हाही विरोधक होतेच…. अकोला कृषी विद्यापीठाच्या आंदोलनात जांबुवंतराव धोटे यांना अटक झाली होती. ते पुण्याच्या तुरुंगात होते… त्यांच्या आईला नागपूरच्या मेयो हॉस्पिलटमध्ये दाखल केल्यावर नाईकसाहेबांनी धोटे साहेबांना-त्यांनी मागणी केली नसताना- १५ दिवस पॅरोलवर सोडले. नुसते सोडले नाही… पुण्याच्या जेलच्या बाहेर गाडी तयार ठेवली… नागपूरच्या विमानाचे तिकीट काढून ठेवले. धोटे साहेबांना जेलरने सांगितले, तुम्हाला पॅराेल मिळाले आहे. बाहेर आले तेव्हा आई आजारी असल्याचे कळले. गाडी तयार होती…. विमानाचे तिकीट होते… मुंबईला आले… नागपूरला गेले….. रुग्णालयात जाण्यासाठी शासनाची गाडी तयार होती… तिसऱ्या दिवशी नाईकसाहेब स्वत: हॉस्पिटलला भेटायला गेले. धोटे साहेबांच्या डोळ्यांत तेव्हा पाणी आले. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. यशवंतरावांनी विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांचा औरंगाबादला सत्कार केला. एस. एम. जोशी यांचा सत्कार केला…. त्यावेळच्या नेत्यांनी विरोधकांना शत्रू मानले नाही. हे घाणेरडे राजकारण फडणवीस यांनी सुरू केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल गेल्या काही वर्षांत सुरू झाला. फडणवीससाहेब, तुम्ही कोणत्याही बाजूंनी बचाव करण्याचा प्रयत्न केलात तरी एक गोष्ट लिहून ठेवा… तुमचा हा पराभव ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचे तुम्ही गटार केलेत’ त्यामुळे लोकांच्या संतापातून झालेला आहे. ही वस्तुिस्थती तुम्हाला कळत नसेल तर, तुमच्या राजकीय ज्ञाानाची मला कीव वाटते. तुम्ही ढीगभर सभा घेतल्या असतील…. पण तोंडपुजे लोक तुमच्या भोवती होते. लोक का शिव्या घालत होते ते कारण तुम्हाला अजूनही कळलेले नाही. आणि तुम्ही आता सांगातात की, विधानसभेच्या निवडणुकीत सव्याज परतफेड करू…. विधानसभेला अजून चार महिनेे आहेत… ती परतफेड कशी करायची, ते मतदार ठरवतील… तुम्ही मतदारांना गृहीत धरले होते…. मोदी- शहा यांचीह तीच अवस्था होती. बेपर्वाईने वागण्याचा कळस झाला होता. मोदींचा मुंबईत जिथं रोड शो झाला… त्याच्या बाजूला होर्डींग पडून २० लोक मृत्यूमुखी पडले होते… २५ माणसं रुग्णालयात होती… ‘त्यांना भेटायला जावे’ असे ना पंतप्रधानांना वाटले ना तुम्हाला वाटले…. तुम्हाला राग येईल… पण, स्पष्ट सांगायला हवे… श्री. नितीन गडकरी हे भाजपामध्येच आहेत. पण, त्यांचे वागणे, बोलणे विरोधी पक्षांबद्दलच्या त्यांच्या भावना अाणि मैत्री त्यांच्या पक्षकामाच्या आड येत नाहीत. ते विरोधकांना शत्रू मानत नाहीत. विरोधी पक्षातही ते बसलेले होतेच… तुमच्यापेक्षा ते कितीतरी पटीने लोकांना गडकरी हे श्रेष्ठ वाटतात. तुम्ही तुमची प्रतिमा स्वत:हून खराब करून घेतलेली अाहे. हे कोणीतरी स्पष्ट सांगायला हवे… वाईट पत्करून हे मी लिहितोय… मला तुमच्याकडे काही मागायचे नाही… कोणाकडे मागायचे नाही… पण, गेल्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे तुम्ही गटार केलेत.. हे इतिहासात लिहिले जाणार आहे. आणि त्याचे खलनायक तुम्ही आहात… तुम्ही काही निष्कर्ष काढलात तरी तुम्ही लोकांना गृहीत धरत होता… आपले कोणी वाकडे करू शकत नाही, अशा तोऱ्यात वावरत होतात. तुमचा तोरा अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे या निकालाने काही फार मोठा शहाणपणा तुम्हाला येईल, अशी स्थिती अजिबात नाही… पण महाराष्ट्र आता इथूनपुढे आता या पद्धतीचे सरकार स्वीकारणार नाही.
महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्याने, कामगाराने, गृहिणीने तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना तुमची जागा दाखवली…. तुमच्या पराभवाचा आनंद आहे असे समजू नका… विजयाने हुरळून जाऊ नये, हेही खरे… पण तुमच्या पराभवामधून पुढच्या पिढीला एक चांगला संदेश जाणार आहे. की महाराष्ट्राचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रातील मतदार चालवून घेत नाही… आणि म्हणून हा निकाल महत्त्वाचा आहे. म्हणून हे स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. आता अिजतदादांनाही स्पष्टपणे काही सांगायला हवे…. अजितदादांनाही लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. तुम्ही कारण नसताना शरद पवारसाहेबांना आव्हान द्यायला गेलात… तुमची ती कुवत नव्हती… ज्यांच्यामुळे तुम्ही आयुष्यात उभे राहिलात…. तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीत. आणि मिळवलेत काय? गेल्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आले नव्हते… आता तुम्ही कारण नसनाता सौ. सुनेत्राताईंना राजकारणात ओढलेत…. आणि जाहीर करून टाकले की, ‘दोन लाख मतांनी त्या निवडून येतील…’
अमोल कोल्हे यांना तुम्ही दम दिलात… ‘गेल्यावेळी मी तुला निवडून आणले होते…’ होय दादा, तुम्ही त्यांना मदत केली होतीत… तुमच्या मदतीचा उपयोग झाला… पण म्हणून ‘कोल्ह्या, तुला आता यावेळी पाडतो’ ही तुमची भाषा होती. ती योग्य वाटते का? उलट त्याला तुम्ही म्हणाला असतात, ‘अरे अमोल, तुला शुभेच्छा….’ तर तुमच्या मनाचा मोठेपणा दिसला असता… १९६२ साली आण्णासाहेब शिंदे यांच्याविरुद्द नगर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे दादासाहेब रूपवते उभे होते. श्रीरामपूरात त्यांची सभा होती. आण्णासाहेबांनी त्यांना त्यांची सभा झाल्यावर घरी जेवायला बोलावले… दादासाहेब आले… निघताना सांगून निघाले, ‘तुम्हाला हरवण्यासाठी पुढच्या सभेला जातो…’ आण्णासाहेब म्हणाले, ‘शुभेच्छा’…. पवार घराण्यात हाच संस्कार आहे.. तुमच्या बारामती विधानसभा मतदारसंघात ५० हजारांचा लीड सुप्रियाताईंनी घेतला. कोणत्या भरवशावर तुम्ही दोन लाखांचा अाकडा सांगितला होता…? पवारसाहेबांचा फोटो लावून तुम्ही त्यांच्या विराेधात राजकारण सुरू केलेत…. नंतर यशवंतरावांचा फोटो लावताय…. लोकांना तेही आवडलेले नाही. आणि आता तर तुमचे पाचपैकी चार उमेदवार पडले… तुमचा पक्ष खरा कसा काय ठरतो? शरद पवारसाहेब कोण आहेत, हे तुम्हाला आता कळले असेल…. खरं म्हणजे तुम्ही सुनेत्राताईंना ईरेला न घालता सुप्रियाताईविरुद्ध स्वत: उभे रहायला हवं होते… म्हणजे मग तो दोन लाखांच्या आकड्याचा हिशेब बरोबर लागला असता… नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण निवडून आले. हा फार मोठा विजय आहे. भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर पराभूत झाले पण हा पराभव त्यांचा नाही… ज्या अशोक चव्हाण यांच्या घरात ५० वर्षे शंकरराव काँग्रेसमुळे सत्तेत होते आणि अशोकराव चव्हाण ३९ वर्षे सत्तेत होते त्या अशोकरावांनी पक्षाशी गद्दारी करून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे नाक या पराभवाने तळापासून कापलेले आहे. उभे न राहिलेले अशोक चव्हाण विरुद्ध उभे राहिलेले वसंतराव चव्हाण अशा लढाईत अशोकरावांना नांदेडमध्ये तोंड दाखवायला अाता जागा नाही. पक्षाने एवढे दिल्यावर कृतघ्न होऊ नये.
आता चार महिन्यांनी विधानसभा आहेच… तेव्हा तुम्ही उभे राहणारच आहात… पवारसाहेबांकडून उद्या समजा रोहीत पवार उभे राहिले तर…. तेव्हा जे घडले त्याचे चिंतन करा… तुम्ही कोणामुळे मोठे झालात हे जर विसरलात तर आणखीन खडड्यात जायला वेळ लागणार नाही.. भाजपाचे महाराष्ट्रातील दिवस संपलेले आहेत. चार महिने सरकारात बसाल… आणि नंतर पहाल… विधानसभेत तुमचे सरकार पुन्हा येणार नाही. लोकांच्या मनातील संतापाची तुम्हाला कल्पना आली नव्हती… तो तुमच्या वागण्याविरुद्धचा संताप होता…. आणि लोकांनी तो व्यक्त केला… आता मुख्य प्रश्न आहे तो मोदींना एन.डी.ए. चे सरकार करावं लागेल… त्यांचा पूर्वीचा सगळा ताेरा आणि रूबाब निघून गेला आहे… तो त्यांना किती निभेल… चंद्राबाबू किती नाचवतील… काळ ठरवेल… इंडिया आघाडीला एक सांगणे आहे… बहुमताचा आकडा जमवण्याच्या भानगडीत पडू नका… सरकार बनवण्याचा प्रयत्न करू नका… मतदारांनी इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे… राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता करा… लोकांच्या प्रश्नावर संसद सभागृहात आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा… आता समोरचे सरकार लेचेपेचे आहे… विरोधी पक्ष म्हणून तुम्ही २३० च्या पुढे आहात… घटनात्मक पद्धतीने मोदी सरकारलाच सळो की पळो करून सोडा… मग त्यांची कशी फजिती होते बघा… तुम्ही सरकार बनवायला जाल तर ‘नेता कोण’? इथपासून भांडणे सुरू होतील… आणि जे जनतेने तुम्हाला दिलेले आहे तेही गमावून बसाल… जनता पक्षाचे सरकार आल्यावर काय झाले, त्याची आठवण करा… चरणसिंग सरकारचे काय झाले, याची आठवण करा… चार पक्षांच्या भरवशावर सरकार करू नका… विरोधी बाकावर बसूनच मोदी सरकारला घेरण्याचे काम करा… मोदी आतून कोलमडून गेलेले आहेत. त्यांना या पराभवाची सवय नाही. त्यांचे राममंिदर, रामभक्ती, ध्यान, ३७० कलम रद्द करणे, हे सगळे जाहिरातबाजी करूनसुद्धा कामाला आलेले नाही… आयोद्धेतही भाजपाचा उमेदवार पराभूत झाला. प्रभू रामचंद्रांना भाजपाचे ढोंग माहिती आहे. आता राममंदिराकडे कोणी ढुंकून बघणार नाही… अशा प्रत्येक विषयावर मोदी सरकारला उघडे पाडा… सहा हजार कोटी रुपयांच कर्जरोखे हे ‘वाॅटरगेट’सारखे प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. धनंजय चंद्रचूडसाहेब यांनी या कर्जरोख्यांची पोलखोल केली. त्याचा संसदीय पद्धतीने वापर करून घ्या… संसदेच्या व्यासपीठावर हे सगळे मुद्दे उपस्थित करून मोदी सरकारची कोंडी करा… पुढचा मार्ग अतिशय स्पष्ट होईल… हे तकलादू सरकार टिकणार नाही. लोकांनी हाच कौल दिलेला आहे. सत्तेच्या मागे लागून हसे करून घेवू नका…
एकदम बरोबर बोललात sahrb