शिर्डीत मोदींची जादू चालणार की पेटणार मशाल ?

वंचितच्या कुक्कर शिट्टीने धनुष्य तुटणार की पेटत्या मशालीवर पडणार पाणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्रातील बहुचर्चित शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतदारसंघात वीस उमेदवार आपलं नशीब अजमावत होते. तर मुख्य लढत ही महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या तीनच उमेदवारांमध्ये होती. या मतदारसंघात एकूण 16 लाख 77 हजार 335 इतके मतदार होते. पैकी 9 लाख 27 हजार 3 मतदारांनी आपला मतदानाचा हक बजावला असून सरासरी एकूण 62 टक्के मतदान झाले. अर्थात 2019 च्या लोकसभा निवणुकी पेक्षा यावर्षी मतदानाला दांडी मरणार्‍यांची संख्या 7,40,887 इतकी होती. देशभरात मतदानाचा घसरलेला टक्का आणि त्याचा कुणाला फायदा तोटा तसेच शिर्डीत मोदींची जादू चालली का मशाल पेटली किंवा पेटत्या मशालीवर वंचितने पाणी टाकले हीच चर्चा सध्या पारावर, चौका चौकात होताना दिसत आहे. त्यातही शिर्डी पेक्षा नगरमध्ये काय होणार या चर्चेला जास्त जागा मिळताना दिसत आहे.


शिर्डी मतदारसंघात एकूण सहा विधासभा मतदारसंघ आणि राहुरी तालुक्यातील काही गावांचा समावेश होता. परंतु या प्रत्येक तालुक्यातील राजकीय समिकरण वेगवेगळे होते. त्यामुळे काही ठिकाणी मशाल पेटली, काही ठिकाणी बाण जोरात चालला तर पाठीमागून कुक्करची शिट्टी देखील जोरात वाचताना दिसत होती. विधानसभेला काँग्रेस आणि लोकसभेला भाजप आघाडीला मताधिक्य देणार्‍या संगमनेरमध्ये यावेळी सर्वात जास्त म्हणजेच सरासरी 65 टक्के इतके मतदान झाले तर काँग्रेस आघाडीला मताधिक्य देणार्‍या अकोले विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी अर्थात 59.82 टक्के मतदान झाले आहे.
राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा निवडणूक यावेळी चांगलीच चुरशीची झाली. आणि ही चुरस खर्‍या अर्थाने वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी निर्माण केली. विशेष बाब म्हणजे खा. लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनवेळा मतदारसंघात आले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले एकदा आले तर कृषीमंत्री दादा भुसे हे मतदारसंघात ठाण
मांडून बसले होते. लोखंडे यांना निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. मात्र विखे पाटील हे डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात नगरमध्ये मग्न होते. दुसरीकडे वाकचौरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनीही सभा घेतल्या. त्यात त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आ. बाळासाहेब थोरात यांची असल्याने त्यांनीही प्रयत्न केले. मात्र त्यांचेही लक्ष हे नगर आणि राज्याच्या इतर भागात होते. अर्थात त्यांची नाराजी देखील लपून राहिली नाही, त्यामुळे दोन्हीकडील अनेक पदाधिकारी शेवटपर्यंत संभ्रमात होते.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर व त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी प्रत्येकी एक सभा घेतली असली तरी वंचितचे कार्यकर्ते तसेच दलित समाजाचे कार्यकर्ते कुठलिही प्रचार यंत्रणा मतदारसंघात नसताना सर्वठिकाणी पोहोच होते. मात्र ऐनवेळी घेतलेली उमेदवारी आणि अपुरी यंत्रणा यामुळे संपूर्ण मतदारसंघात जरी रुपवते पोहचू शकल्या नाहीत तरी माध्यमांनी व सोशल मिडीयाने त्यांना प्रचारात मोठी जागा दिली. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जाळे म्हणावे इतके पसरले नसल्याने तसेच रूपवते यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावरच अवलंबून राहावे लागले. मात्र मतदारांची दोन्ही उमेदवारांवरील नाराजी त्यांच्या पथ्यावर पडली तर या मतदारसंघाचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. कागदावर लोखंडे यांचे पारडे जड दिसत असले तरी वाकचौरेंची हवा आणि दुर्लक्षित असलेल्या परंतू निर्णायक ठरणार्‍या वंचितचा प्रभाव यावरच ही निवडणूक झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख