गैरप्रकारांवर आमदार अमोल खताळ यांचा कडक इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेरमध्ये लवकरच शिवसेनेत मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होणार असल्याची माहिती समोर आली असून, काही प्रमुख नेत्यांचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर तालुक्यातील विविध गैरप्रकारांवरही त्यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला.

शिवसेनेत मोठे प्रवेश लवकरच – राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना वेग आला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी शिवसेनेकडे वळत आहेत. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात प्रवेश सुरू असून, संगमनेरमध्येही लवकरच मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे खताळ यांनी सांगितले. इतर पक्षांतील खासदार किंवा नेते शिवसेनेत येत असतील, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
वडगाव पान ‘दत्तधाम’ प्रकरणात कारवाईचा इशारा- वडगाव पान येथील दत्तधाम सरकार येथे कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार होतात असा दावा करून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारींबाबत आमदार खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शोषण केले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. तक्रारदार पुढे आल्यास पोलिसांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सोशल मीडियाद्वारे अशा प्रकारांचे मार्केटिंग करणार्यांवरही कारवाई केली जाईल. तसेच दत्तधाममध्ये गेलेल्या पोलिस कर्मचार्यांचीही चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देताना आ. खताळ म्हणाले की, अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त करत समाजात अशा कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असे खताळ यांनी ठामपणे सांगितले. संगमनेर शहरातील चावडी तलाठी कार्यालयात अधिकृत परवानगीशिवाय एजंट बसून नागरिकांकडून पैसे घेऊन कागदपत्रांवर शिक्के-सही करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित तलाठी, कर्मचारी आणि एजंटवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्यास योग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, मात्र नागरिकांची लूट सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सदर एजंटने आतापर्यंत किती नागरिकांकडून पैसे उकळले, तसेच त्याने किती संपत्ती जमा केली याची सखोल चौकशी केली जाणार आहे. पुढील काळात तो पुन्हा कार्यालयात आढळल्यास किंवा त्याला कोणी अधिकारी -कर्मचारी पाठीशी घालत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार खताळ यांनी दिला.
तलाठी किंवा तहसील कार्यालयात कोणताही एजंट नागरिकांची फसवणूक करत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा एजंटांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांनाही सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिला आहे.






















