भोंदू गडगे बाबावर कायदेशीर कारवाई करणार – ॲड. रंजना गवांदे

0
6

अंनिसवरील आरोप निराधार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे बाबांच्या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तेथील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेर उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याचबरोबर या भोंदू गडगे बाबांसारख्या अनेक बाबांच्या करारनाम्यांचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वारंवार केला आहे. त्यामुळेच या तथाकथित गडगे बाबाने आपल्याच माणसांना हाताशी धरून अंनिसवर खंडणी मागितल्याचा बोगस व मानहानी करणारा आरोप केला आहे. वास्तविक सदर व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तींशी अंनिसचा कुठलाही संबंध नाही. मात्र या व्हिडिओ मुळे अंनिसची बदनामी झाली असून याबाबत गडगे बाबा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दैनिक युवावार्ताशी बोलताना दिली.

तालुक्यातील वडगाव पान येथे तथाकथित दत्तधाम मधील भोंदू गडगे बाबा विरुद्ध अंनिसने आक्रमक भूमिका घेतल्याने व सर्वसामान्य नागरिकांच्या होणार्‍या फसवणूकीबद्दल या बाबांवर कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका अंनिसने घेतल्याने या बाबाचे पित्त खवळले. त्यामुळे त्याने आपल्याच माणसांना हाताशी धरून अंनिससह इतर पोलिस अधिकारी यांच्यावर खंडणीचा आरोप करणारा बोगस व्हिडिओ बनवून समाजमाध्यमावर टाकले. प्रत्यक्षात मात्र या व्हिडिओमध्ये खंडणी मागणारे किंवा अंनिसचे नाव घेणारे इसम यांना आपण ओळखत देखील नाही किंवा ते अंनिसचे कार्यकर्ते देखील नाही. तसेच हा संपूर्ण व्हिडिओ जाणिवपूर्वक बनविण्यात आला असून त्यात वारंवार अंनिस व आपले नाव घेण्यास त्या व्यक्तीला भाग पाडले जात असल्याचे दिसते. तसेच या बाबाने काही जणांना हाताशी धरून आपला फोटो वापरून हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले आहे. हा प्रकार कायदेशीर गुन्हा असून याबाबत आपण सदर बाबा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत.

दरम्यान अंनिसने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गड़गे बाबांच्या दरबारात लोकांना झौषधे दिली जातात, ते औषधे देणारे डॉक्टर पदवीधारक आहेत का? येणार्‍या लोकांकडून घेतली जाणारे शुल्क अथवा अन्य स्वरूपातील रक्कम, औषध भांडार, औषध विकणारा, त्या संबंधाने नोंदणी, परवाना या सर्व बाबी तपासणी करून तसा अहवाल आम्हास अवगत व्हावा व गडगे बाबांची भोंदूगिरी बंद होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 29 मार्चला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भोंदूंवर कायदेशीर कारवाई होऊन दरबार ताबडतोब बंद व्हावा व अन्य मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्यासह समितीच्या पदाधिकार्‍यांनी केली होती. त्याच्याच भीतीने या बाबाने आपल्यावर व संघटनेवर हे खोटे आरोप केले आहेत. त्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो असे देखील अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here