संगमनेर चावडीतील कारभाराचा ‘भोंगळ’ चेहरा उघड

0
438

खासगी लोकांच्या ताब्यात दप्तर, आ. अमोल खताळांची धडक दखल, पण सुधारणा कधी?

युवावार्ता (प्रतिनिधी)
शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयातील गंभीर गैरप्रकारांमुळे महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. शासनाच्या कार्यालयात अधिकृत कर्मचार्‍यांऐवजी खासगी व्यक्ती बसून नागरिकांची कामे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुरी कर्मचारी संख्या यामुळे तलाठी कार्यालयातील कामकाज कोलमडले आहे. एकाच तलाठ्याकडे तीन-तीन गावांचा कारभार सोपवण्यात आल्याने तो बहुतांश वेळा मिटिंगच्या नावाखाली बाहेर असतो. परिणामी कार्यालयात खासगी एजंटांचेच राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना आपली कामे वेळेत करून घेण्यासाठी या एजंटांकडे जास्त पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार सर्वत्र ऐकायला मिळते.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी अचानक चावडी येथील तलाठी कार्यालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. खासगी व्यक्तींच्या उपस्थितीवर त्यांनी संताप व्यक्त करत संबंधितांना जाब विचारला. त्यांच्या या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील अनियमितता आणि कोतवालांच्या मनमानीचा प्रकारही समोर आला आहे.

माहितीनुसार, चावडीवरील तलाठी कार्यालयात नियुक्त कोतवाल इतरत्र काम करत असून, दुसर्‍या गावातील कोतवाल येथे काम पाहत आहे. ही नेमणूक अधिकृत आहे की मनमानी, याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, येथे दोन नव्हे तर तीन खासगी व्यक्ती काम करत असून, त्यातील एकाने आपल्या नातलगालाही येथे बसवले असल्याची माहिती पुढे आली आहे. अंतर्गत वादातूनच हा प्रकार उघडकीस आल्याचे बोलले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून चावडीतील हीच परिस्थिती कायम असून, महसूल विभागाला स्वतंत्र व सुसज्ज तलाठी कार्यालय उभारता आलेले नाही. जुन्या आणि वादग्रस्त जागेत सुरू असलेल्या या कार्यालयाच्या मालकीबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे ही जागा दर्ग्याची आहे असे सांगून काही जण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात, अशीही चर्चा आहे. या सगळ्या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – शासकीय कागदपत्रांवर खासगी व्यक्ती हाताळणी करत असतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांची भूमिका काय? महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष का?

नागरिकांच्या मते, एजंटगिरीचा हा प्रकार केवळ चावडीपुरता मर्यादित नसून तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू आहे. यातून निर्माण होणारा काळा पैसा नेमका कुणाच्या खिशात जातो, याबाबतही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.
आ. अमोल खताळ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या असल्या, तरी केवळ धडक भेटीपुरतेच हे मर्यादित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खर्‍या अर्थाने बदल घडवण्यासाठी महसूल विभागाने तातडीने कर्मचारी नियुक्ती, स्वतंत्र कार्यालयाची उभारणी आणि एजंटगिरीवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी तलाठी कार्यालयात अचानक भेट देत तेथील एजंटांचा कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर तेथील एका कर्मचार्‍याने आमदार खताळांबाबत चुकीची भाषा वापरल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज संबंधित कर्मचार्‍यांचा टेबल काढून घेत त्याला घरी पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here