तीन दिवसांत खुलासा न केल्यास ५० हजारांचा दंड; परवाना रद्दचाही इशारा
संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग, वाहतुकीस होणारा अडथळा आणि परिसरात निर्माण होणारी अस्वच्छता याबाबत गंभीर दखल घेत संगमनेर नगरपरिषदेने संबंधित व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच प्रशासनाच्या पाहणीत असे आढळून आले की, सायंकाळच्या वेळेत वेदांत वाईन्ससमोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असून अनेक वाहने रस्त्यालगत आणि काही वेळा रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
याशिवाय, वाईन्स दुकानासमोर होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील शिस्त बिघडत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. काही नागरिकांनी मद्यप्राशन केलेल्या व्यक्तींमुळे सार्वजनिक ठिकाणी गैरसोयीचे वातावरण निर्माण होत असल्याची बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यवस्थापनाला गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करणे, वाहनतळाचे योग्य नियोजन करणे आणि ग्राहकांकडून होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दैनंदिन निर्माण होणारा घनकचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत न देता सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याचेही प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत असल्याची नोंद नोटिशीत करण्यात आली आहे.
या सर्व बाबींवर संबंधित व्यवस्थापनाने तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश नगरपरिषदेने दिले आहेत. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियेचाही विचार केला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यासोबतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे किंवा वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहणे आणि शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक व्यावसायिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला नगरपरिषद पाठीशी घालणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाईल.”