“बेस्ट लायन्स क्लब” किताब; जागतिक पातळीवर गौरव

संगमनेर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्य, सेवा, नेतृत्व आणि समाज परिवर्तनाच्या माध्यमातून संगमनेरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या लायन्स क्लब ऑफ संगमनेर सॅफ्रॉन सफायरने अभूतपूर्व यश संपादन करत इतिहास रचला आहे. तब्बल ७५६ सदस्यसंख्या असलेला हा क्लब आज जगातील सर्वात मोठ्या सदस्यसंख्येच्या लायन्स क्लबपैकी एक ठरला असून, मल्टिपल डिस्ट्रिक्ट ३२३४ (संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास ५०० लायन्स क्लब) यामधून “बेस्ट लायन्स क्लब” म्हणून गौरविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, क्लबच्या तब्बल २० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी सेवा संस्था मानली जाते. “We Serve” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन जगभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, दिव्यांग सहाय्य आणि आपत्ती निवारण यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्य केले जाते. त्याच परंपरेला पुढे नेत लायन्स क्लब संगमनेर सफायरने गेल्या वर्षभरात समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अक्षरशः मालिका राबवली.
क्लबने आयोजित केलेला सफायर बिझनेस एक्स्पो, एक हात मदतीचा, सफायर मॅरेथॉन, सफायर आयडॉल, महिला सक्षमीकरण अभियान, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, पर्यावरण संवर्धन मोहिमा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप, गरजू कुटुंबांना अन्नधान्य वितरण, दिव्यांगांना सहाय्य साहित्य वाटप, सामाजिक जनजागृती मोहिमा, ग्रामीण भागातील शाळांना स्वच्छतागृहांचे वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे समाजात प्रभावी काम उभे केले. विशेष म्हणजे, प्रत्येक उपक्रमामागे समाजातील प्रत्यक्ष गरज ओळखून कार्य करण्याचा क्लबचा दृष्टिकोन दिसून आला.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मल्टिपल कन्व्हेन्शनमध्ये क्लबला तब्बल ११ प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. “बेस्ट लायन्स क्लब” पुरस्कारासाठी ॲड. कल्याण कासट, “फॅमिली अँड वूमन मेंबरशिप”साठी नामदेव मुळे, “GET अचिव्हमेंट्स” व “इंटरनॅशनल प्रेसिडेंट सर्टिफिकेट” तसेच “मल्टिपल सर्टिफिकेट”साठी धनंजय धुमाळ, “GMT अचिव्हमेंट्स”साठी उमेश कासट, “लायन्स इमेज बिल्डिंग”साठी श्रीनिवास भंडारी, “पब्लिक रिलेशन”साठी सुमित मणियार, “वूमन एम्पॉवरमेंट”साठी प्रियांका कासट, “शायनिंग स्टार MCC अवॉर्ड” व “मल्टिपल सर्टिफिकेट”साठी अतुल अभंग यांना सन्मानित करण्यात आले.

क्लबचे अध्यक्ष ॲड. कल्याण कासट, सचिव सुमित मणियार आणि खजिनदार नामदेव मुळे यांनी वर्षभर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नेतृत्व करत विविध सेवा प्रकल्प यशस्वी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने सदस्यसंख्या वाढ, सेवा उपक्रम आणि समाजातील प्रभाव या तिन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष एम.जे.एफ. गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, तसेच वर्षभर सातत्याने सक्रिय राहिलेले सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळेच हा मान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.





















