शिक्षण प्रसारक संस्थेवर मालपाणी पॅनलचे वर्चस्व

0
2

अॅड. संग्राम जोंधळेंची एकाकी लढत

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर येथील नामांकित शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत पॅनलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज फोल ठरवत एकमेव उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या अ‍ॅड. संग्राम जोंधळे यांनी संपूर्ण सत्ताधारी पॅनलला जोरदार टक्कर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या जागांसाठी एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 30 उमेदवार हे संजय मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत पॅनलचे होते, तर अ‍ॅड. संग्राम जोंधळे हे एकमेव स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले असल्याची चर्चा होती; मात्र अ‍ॅड. जोंधळे यांनी उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदानाच्या दिवशी एकूण 519 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण बलाढ्य पॅनल आणि त्यांच्या यंत्रणेच्या विरोधात एकट्याने मैदानात उतरलेल्या अ‍ॅड. जोंधळे यांनी 112 मते मिळवत सत्ताधार्‍यांसमोर एक मोठे आव्हान उभे केले. निकालात त्यांचा पराभव झाला असला, तरी मिळालेली मतसंख्या सध्या संगमनेरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मतमोजणीनंतर मालपाणी पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करत विजय साजरा केला. मात्र दुसरीकडे, अ‍ॅड. जोंधळे यांना मिळालेला पाठिंबा हा संस्थेतील काही सभासदांमधील अंतर्गत नाराजीचा संकेत मानला जात आहे. संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता, निर्णयप्रक्रिया आणि नेतृत्वशैलीबाबत असलेली नाराजी मतांच्या स्वरूपात दिसून आल्याची चर्चा काही सभासदांमध्ये सुरू आहे. सर्वाधिक 490 मते मिळवत संजय मालपाणी हे अव्वल ठरले असले, तरी एकाकी लढतीत अ‍ॅड. संग्राम जोंधळे यांनी उभे केलेले आव्हान भविष्यातील संस्थात्मक आणि राजकीय बदलांचे संकेत देणारे मानले जात आहे. आगामी काळात संस्थेच्या निर्णयप्रक्रियेत आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शहरातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात आता पुढील समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे.

आट्टल ओंकार रामदयाळ (485), करवा संतोष मोहनलाल (472), कालडा गिरिश राधाकिसन (465), कासट अरविंद गंगाबिसन (482), चोथवे संदिप दत्तात्रय (453), चांडक नरेंद्र, बद्रिनारायण (486), जाजु दिपक श्रीनिवास (449), डंग जसपाल सिताराम (479), डंग महेश बिहारीलाल (483), ताजणे अरुण लहाणू (472), थोरात किसन केशवराव (450), देशमाने बाळासाहेब भास्करराव (455), नावंदर मधुसुदन सुभाषचंद्र (464), नावंदर श्रीहरी अरुणकुमार (459), पलोड सचिन लक्ष्मीनारायण (467), पवार रवींद्र रत्नाकर (470), पारख नंदलाल बन्सीलाल (465), पंडीत सात्विक अमित (468), बाफणा ऋषीकेश नंदनमल (462), भुतडा अ‍ॅड. राजेश जगदीश (483), मणियार अनिश कमलकिशोर (462), मालपाणी संजय ओंकारनाथ (490), राठी अनिल पन्नालाल (480), राठी केदारनाथ चंपालाल (475), लठ्ठा डॉ. राजेंद्र शंकरलाल (474), लाहोटी गणेश शिवप्रसाद (484), शाह आशिष अरविंद (463), सराफ डॉ. पराग प्रकाश (473), सातपुते अनिल जगन्नाथ (479), सोमाणी कैलास श्रीनिवास (482).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here