संगमनेरच्या शेतकऱ्यांचा इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकर्यांना सन 2025 च्या खरीप हंगामातील पीकविमा नुकसान भरपाई 29 मेपर्यंत देण्यात यावी, अन्यथा संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना संगमनेर आणि तालुक्यातील पीकविमाधारक शेतकर्यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि कृषी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेच्या निवेदनानुसार, सन 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध भागातील शेतकर्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली असताना संगमनेर तालुक्यातील शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेतकरी संघटनेने प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, महसूल व कृषी विभागाने अंतिम पीक कापणी अहवाल तयार करताना प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन पंचनामे करण्याऐवजी हलगर्जीपणे काम केले. परिणामी उंबरठा उत्पादनाचे आकडे वास्तवापेक्षा अधिक दाखविण्यात आले. प्रत्यक्षात संगमनेर तालुक्यातील अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जर शेतात जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात आली असती, तर उत्पादनातील घट स्पष्ट झाली असती आणि शेतकर्यांना पीकविमा लाभ मिळाला असता, असा दावा करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कमी उंबरठा उत्पादनाच्या आधारे नुकसान भरपाई मंजूर झाली असताना केवळ संगमनेर तालुक्यात वेगळी आकडेवारी दाखवून शेतकर्यांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापूर्वी 11 मे रोजी शेतकरी संघटना अहिल्यानगरच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात 29 मेपर्यंत संगमनेर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकर्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकरी संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडून न्यायासाठी लढा उभारतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शेतकरी संघटना संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे, जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, बाळासाहेब घोगरे, सोमेश्वर साबळे, गणपत फटांगरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.





















