घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. थोरातांवर निलंबनाची मागणी

0
64

आमदार खताळ यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

युवावार्ता (प्रतिनिधी)
घुलेवाडी -संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत थोरात यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी थेट राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, तालुक्यातही विविध स्तरांतून चर्चेला उधाण आले आहे.
आमदार खताळ यांनी आपल्या निवेदनात गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हटले आहे की मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असलेले स्वर्गीय सिद्धार्थ नितीन कुमार यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक होते. त्यासाठी मृतकाच्या नातेवाईकांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत थोरात यांच्याकडे वारंवार विनंती केली. मात्र, त्यांनी शवविच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 36 तास मृतदेह शासकीय रुग्णालयात पडून राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर वरिष्ठ अधिकार्‍यांनी निर्देश दिल्यानंतरही डॉ. थोरात यांनी आदेशांचे पालन केले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मृतकाच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही आमदार खताळ यांनी नमूद केले आहे.
या घटनेबाबत विविध माध्यमांतून सविस्तर बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित वृत्तांकनाचा राग मनात धरून डॉ. थोरात यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी न घेता थेट एका वृत्तपत्राचे संपादक आणि कार्यकारी संपादक यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्‍या प्रसारमाध्यमांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आ. खताळ यांनी पुढे म्हटले आहे की, डॉ. थोरात यांच्याकडून रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या सामान्य नागरिकांशी उद्धट व अरेरावीची भाषा वापरली जाते. तसेच वाद निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तींना थेट अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची धमकी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यांच्या या कथित वर्तणुकीमुळे रुग्णालयातील काही कर्मचारी आणि अधिकारीही दबावाखाली काम करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉ. प्रशांत थोरात यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here