कत्तलखान्यांवर पालिका-पोलिसांचा हातोडा

0
8

सात अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त

संगमनेरमध्ये मोठी संयुक्त कारवाई; अतिक्रमण हटवून परिसर मोकळा

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)
शहरातील वाढत्या अनधिकृत कत्तलखान्यांवर अखेर संगमनेर नगरपालिकेने आणि शहर पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई करत सात बेकायदेशीर कत्तलखाने जमीनदोस्त केले. मंगळवारी (दि. २) सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही मोहीम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने थेट हातोडा चालवला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर, उम्मत नगर, जोर्वे परिसर तसेच पुणे नाका भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या. यापैकी अनेक ठिकाणी शासकीय व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आली होती. याबाबत नगरपालिकेने संबंधितांना पूर्वसूचना व नोटिसा बजावल्या होत्या. मात्र नोटिसांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमणे कायम ठेवण्यात आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला.
मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान काही कत्तलखाना चालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस प्रशासनाने तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई निर्विघ्नपणे पार पाडली.


नगरपालिकेचे जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने प्रत्येक ठिकाणी पाहणी करून संबंधित बांधकामे हटवली. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले.
या मोहिमेत नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अतिक्रमण विभाग प्रमुख महेश गोरडे, प्रदीप मावळकर, अल्ताफ शेख, जयराम मंडलिक, राजेंद्र म्हस्के, किशोर बिडगर यांच्यासह पालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि शहर पोलिस ठाण्याचे मोठे पथक सहभागी झाले होते.


मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले की, शहरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे आणि अनधिकृत कत्तलखान्यांविरोधात प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा, स्वच्छतेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल.
या धडक कारवाईमुळे शहरातील अनधिकृत कत्तलखाना चालकांमध्ये खळबळ उडाली असून, अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ शहराच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here