महावितरणच्या खांबांवर खासगी कंपन्यांचे आणि क्लासेसचे अतिक्रमण

युवावार्ता (प्रसाद सुतार)
संगमनेर – संगमनेर शहरात सध्या केबल टीव्ही आणि हायस्पीड इंटरनेट देणार्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. मात्र, या स्पर्धेत शहराचे विद्रुपीकरण होत असून सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. इंटरनेट आणि केबलच्या तारांचे जाळे शहरात झपाट्याने पसरत असताना, हे चालक नियमांचे उल्लंघन करून खासगी इमारती आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) खांबांचा सर्रास वापर करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संतप्त नागरिक यांना परवानगी कोणी दिली? असा सवाल उपस्थित करत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, गल्लीबोळ आणि रहिवासी भागांत महावितरणच्या वीज वाहक खांबांवरून केबल आणि इंटरनेटच्या शेकडो तारा ओढल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी या तारांचे वेटोळे खांबांवर लटकलेले दिसतात. पावसाळ्यात किंवा वार्यामुळे या तारांचा विजेच्या मुख्य वाहिनीशी संपर्क येऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, महावितरणच्या खांबांचा असा वापर करणे बेकायदेशीर असतानाही हे काम बिनदिक्कतपणे सुरू आहे.
खासगी क्लासेसकडून जाहिरातींसाठी खांबांचा वापर
केबल चालकांप्रमाणेच शहरातील विविध खासगी शिकवणी वर्गांचे (क्लासेस) मालकही मागे नाहीत. विजेच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे बोर्ड, फ्लेक्स आणि पत्रे लावले जात आहेत. यामुळे वीज कर्मचार्यांना दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढताना अडथळा निर्माण होत आहे. जाहिरातींच्या या भडीमारामुळे शहराचे सौंदर्य तर नष्ट होतच आहे, पण त्यासोबतच अपघाताचे निमंत्रणही दिले जात आहे.
शहरातील सुज्ञ नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासगी मालमत्तेवर आणि सरकारी खांबांवर विनापरवाना तारांचे जाळे टाकले जात असताना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या तारांमुळे अनेकदा घरातील केबल वायरमध्ये हाय व्होल्टेज येऊन उपकरणे जळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. संगमनेर शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी आता महावितरण आणि नगरपरिषद प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही अनेक दिवसांपासून हा प्रश्न गंभीर बनलेला असतांना याकडे नगरापलीका व महावितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे.





















