नगरसेवक सौरभ कासार यांचा पुढाकार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेअंतर्गत आमदार सत्यजीत दादा तांबे यांच्या सूचनेनुसार व नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिनांक 20 ते 24 एप्रिल दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम व प्री-मान्सून स्ट्राईक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेला नगरसेवक सौरभ कासार यांनी दिलेला पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
प्रभागातील दुर्लक्षित व कचर्यामुळे अस्वच्छ बनलेल्या ठिकाणांची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील अस्वच्छता कमी होऊन डुकरांचे वास्तव्य नष्ट होण्यास मदत झाली आहे. तसेच सर्व कॉलनीमधील रस्त्यांची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आगामी पावसाळा लक्षात घेऊन पाणी साचू नये यासाठी गटारांची साफसफाई व चेंबर्सची दुरुस्ती करण्यात आली. यासोबतच विद्युत वाहिन्यांखाली वाढलेल्या झाडांची छाटणी आणि स्ट्रीट लाईट्सची दुरुस्तीही हाती घेण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण प्रभागात जंतुनाशक फवारणी व फॉगिंग करण्यात येत असून, आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
नगरसेवक सौरभ कासार यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे प्रभागातील प्रलंबित कामांना गती मिळाली असून नागरिकांकडूनही या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू असलेली ही मोहीम आदर्शवत ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक सौरभ कासार यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार इतर नगरसेवकांना देखील प्रेरणादायी ठरत आहे.





















