संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी सीए संजय राठी, व्हा. चेअरमनपदी रवींद्र पवार

0
24

डिजिटल व डोअर स्टेप बँकिंगवर भर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- सभासद आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे संगमनेर मर्चंट बँकेची घोडदौड निरंतर सुरु असून संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे. शाखा विस्तार मोहिमेअंतर्गत नाशिकनंतर आता लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे बँकेची नवीन शाखा उघडली जाणार आहे अशी महत्त्वपूर्ण घोषणा बँकेचे नूतन चेअरमन सीए संजय राठी यांनी केली.
सोमवारी (ता.20) बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निरीक्षणाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदी सीए संजय राठी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी बँकेचे मार्गदर्शक व मावळते चेअरमन, उद्योगपती राजेश मालपाणी, मावळते व्हा.चेअरमन मधुसूदन नावंदर, संस्थापक दिवंगत ओंकारनाथ मालपाणी यांच्या पत्नी मातोश्री ललितादेवी मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर राजेश मालपाणी यांच्या हस्ते नूतन चेअरमन संजय राठी यांचा, तर मधुसूदन नावंदर यांच्या हस्ते रवींद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात सीए संजय राठी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, राजेशभाऊ मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने हीरक महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. गेल्या 30 वर्षांपासून माझे या बँकेशी ऋणानुबंध आहेत. संस्थापक ओंकारनाथजींनी दिलेला पारदर्शकतेचा आणि काटकसरीचा वारसा आपण पुढे नेत आहोत. आज बँकिंग क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून रिझर्व्ह बँकेची धोरणे बदलली आहेत. आता ग्राहकांचे राज्य असून स्पर्धेमुळे नफ्याचे प्रमाण केवळ एका टक्क्यावर आले आहे. आगामी काळ हा ‘डोअर स्टेप बँकिंग’ आणि ‘डिजिटल बँकिंग’चा आहे. कार्यक्षम कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळाच्या साथीने आपण बँकेची प्रगती अधिक वेगवान करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मावळते चेअरमन राजेश मालपाणी यांनी बँकेच्या प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, 1990 मध्ये संस्थापक ओंकारनाथजींच्या काळात बँकेने शंभर कोटींच्या संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठला होता. 1996 मध्ये 100 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आणि आता हीरक महोत्सवी वर्षात सर्वांच्या सहकार्याने एक हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व सहकारी आणि कर्मचार्यांना देताना, करते हो तुम कन्हैय्या, मेरा नाम हो रहा है… या ओळी उद्धृत करत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मातोश्री ललितादेवी मालपाणी यांनी बँकेच्या स्थापनेच्या वेळच्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला. मावळते व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनीही आपला कार्यकाळ सार्थ ठरल्याचे सांगत आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी नरेंद्र चांडक, विवेक कासार, अमित पंडित, डॉ.संजय मालपाणी, संजय लाहोटी, श्रुती राठी, बापूसाहेब टाक, महेश वाकचौरे, सुधाकर जोशी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, जयवंत पवार आणि ओंकारनाथ भंडारी यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संतोष करवा यांनी केले, तर आभार प्रदर्शन नूतन व्हाईस चेअरमन रवींद्र पवार यांनी केले. या निवडीचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here