संगमनेर ( प्रतिनिधी )
विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी पार पडल्या. यात संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी मा. जि. प. सदस्य मिलिंद माधवराव कानवडे यांची तर शहराध्यक्षपदी सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस तालुका व शहर पदाधिकार्यांच्या निवडीनिमित्त काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नवीन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, हैदर आली, गौरव डोंगरे, सौ. प्रमिलाताई अभंग, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, आनंद वर्पे, संतोष हासे, सुहास आहेर, राजेंद्र चकोर आदींसह तालुका काँग्रेसचे सर्व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मिलिंद कानवडे व सोमेश्वर दिवटे हे दोघेही उच्चशिक्षित असून मिलिंद कानवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संगमनेर खुर्द गटातून अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. आ. थोरात व आ. डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास योजना त्यांनी या गटातून राबवले आहेत .मोठा जनसंपर्क, सातत्याने काम करण्याची पद्धत व प्रभावी वकृत्व यामुळे त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून सोमेश्वर दिवटे यांनी युवकांची मोठी फळी उभी केली होती या माध्यमातून आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. या दोन्ही नव्या दमाच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही जपणारा व देशाच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. काँग्रेसवर अनेक संकटे आली तरी हा पक्ष कायम खंबीरपणे उभा राहिला आहे. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मागील अध्यक्ष बाबा ओहोळ व विश्वासराव मुर्तडक यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. हीच परंपरा नवीन पदाधिकारी ही सांभाळतील.
आगामी काळामध्ये नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची सर्वात मजबूत आणि भक्कम फळी आहे. नव्या जुन्यांचा मेळ घालत काम करणारा विकासाचा तालुका म्हणून आपला लौकिक आहे. सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर सुंदर व वैभवशाली झाले आहे. शहराच्या चारही बाजूने रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. स्वच्छ व मुबलक पाणी प्रत्येकाला मिळत आहे. रस्ते, वैभवशाली इमारतींसह सर्व सुविधा शहरात आहे. ही विकासाची वाटचाल कायम ठेवताना आगामी काळात सर्व निवडणुका ह्या अत्यंत मोठ्या फरकाने आपल्या सर्वांना जिंकण्यासाठी काम करायचे आहे असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, राज्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात काँग्रेसचे मोठे काम होत आहे. संगमनेर तालुका हा कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहीला आहे. नवीन पदाधिकार्यांना आगामी काळामध्ये मोठी संधी आहे.
याप्रसंगी नवीन ग्रामीण उपाध्यक्ष विजय रामनाथ रहाणे, बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र देवराम दिघे, खजिनदार म्हणून के.के. थोरात, तर सदस्य म्हणून रायभान पवार, रामनाथ कु-हे, दत्तात्रय कोकणे, संजय साबळे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून अॅड. त्रिंबक गडाख, अॅड. अशोक हजारे, सोमनाथ गोडसे, भारत शेलकर, ह.भ.प.नवनाथ आंधळे, भारत वर्पे, सौ. मीराताई शेटे यांची निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्ष म्हणून गणेश मादास, ज्ञानेश्वर नाईक, खजिनदारपदी डॉ. सुचित गांधी, तर सदस्य म्हणून राकेश नवले, सतीश शिंदे, कपिल क्षत्रीय यांची निवड झाली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, हिरालाल पगडाल, अभय खोजे, सौ.छाया उपाध्ये, सौ.सुषमा भालेराव, विलास ताजने यांची निवड झाली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आमदार डॉ. तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रदेश कमिटीवर प्रतिनिधी म्हणून निवड
काँग्रेसच्या नव्याने होत असलेल्या निवडणुकांमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून संगमनेर शहर ब्लॉक कमिटीतून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची तर ग्रामीण ब्लॉकमधून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे .यावेळी आ. डॉ. तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला