राजूर (प्रतिनिधी)
अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे परिसरातील सर्व बंधारे, ओढे-नाले, तुडूंब भरले आहे. तसेच अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पर्यटकांना रस्त्यांचा व पाण्याचा निटसा अंदाज येत नसल्याने दुर्घटना घडत आहे. तालुक्यातील वारंघुशी फाटा येथे कृष्णावंती नदीत एक पर्यटकांची गाडी वाहुन गेली असून त्यात दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकाने प्रसंगावधान राखुन स्वत:ची सुटका केली आहे. तर यावेळी मदतकार्य करणार एक जण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीची वेळ असल्यामुळे, ही घटना लवकर लक्षात आली नाही. त्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला. या अपघातात अॅड. आशिष प्रभाकर पालोदकर (वय 34, रा. पोलाद, ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) व रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 34, रा. ताड पिंपळगाव ता. कन्नड, जि.औरंगाबाद) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे सुदैवाने बचावले आहेत. तर मदत करताना वाहून जाणार्याचे नाव मात्र समजू शकले नाही. यातील आशिष पालोदकर हे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांचा धाकटा मुलगा होता.
अकोले हे महत्वाचे पर्यटन स्थळ असून ते पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक येत असतात. शुक्रवारी औरंगाबाद येथील वकीली व्यवसायातील काही तरूण निसर्ग पर्यटनासाठी आले होते. सदर पर्यटक दोन दिवस भंडारदरा पर्यटन करुन कळसुबाईकडून भंडारदर्याच्या दिशेने येत असताना पेंडशेत फाट्याजवळ एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने या पर्यटकांची क्रेटा गाडी (क्रं. एमएच 20 ईवाय 8887) ही कृष्णावंती नदीत बुडाली. यावेळी पाठीमागुन आलेल्या दुसर्या गाडीतील तरुणाने ही घटना पाहिली व मदतीसाठी धावला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही प्रवाहात वाहून गेला. दरम्यान एका स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने गावकर्यांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. पोलीसांना माहिती दिल्यानंतर संजय खाडे, अंकुश कर्कुले, पंढरीनाथ खाडे, तुषार खाडे या नागरिकांसह सहा.पो.नि. नरेंद्र साबळे, पो.कॉ. दिलीप डगळे, फटांगरे दादा, गाडे दादा यांनी यातील अनंता मगर यांना बाहेर काढले. तसेच गाडी पाण्याबाहेर काढली.
या दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. भंडारदरा पाणलोट क्षेत्र हे महाराष्ट्राचे चेरापुंजी आहे. याठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. नवीन पर्यटकांना येथील रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. बर्याचवेळा चालक गुगल मॅपचा आधार घेतात त्यामुळेही चालकांचा अंदाज चुकून दुर्घटना घडते. पाण्यात गाडी वाहून जाण्याच्या अनेक दुर्घटना यापुर्वीही घडल्या आहेत. डोंगर दर्यांमधून येणार्या पाण्यामुळे रत्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे कोणीही नाहक धाडस करुन स्टंटबाजी करु नये. जेथे धोका आहे अशा ठिकाणी जाऊ नये. सेल्फीच्या नादात दरी, पाणी, भिंती, ओढे, झाडे या ठिकाणी धाडसाचे प्रयोग करु नये. पर्यटकांनी आपली वाहने सावकाश चालवावीत. ज्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे तेथे जाण्याचे धाडस करु नये. असे आवाहन राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.