अकोले (प्रतिनिधी)
तालुक्यातील एका गावात एका नराधम पित्याने आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. याप्रकरणी 15/02/2018 रोजी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन नराधम पित्याविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ।7/2018 भादंवि कलम 376 (2) व बाललैंगीक अत्याचार कायदा कलम 4, 5 (5)(2) व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी नराधम पित्यास दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा व 60 हजार रुपयांचा दंड केला आहे. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणार्या या घटनेने त्यावेळी तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र आज संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा केली आहे.
याबाबत माहिती अशी की, अकोले तालुक्यातील गावात पिडीत पंधरा वर्षीय मुलगी आपल्या आई-वडील व दोन भावांसह एकत्र रहात होते. दरम्यान तिच्या वडीलाला दारुचे व्यसन होते. त्यातुनच जून 2017 रोजी पिडीत मुलगी घरात कुटूंबासह झोपली असताना तिचे वडील दारु पिऊन आले. यावेळी या नराधम पित्याने स्वतःच्या मुलीशी लगड करुन तिचे तोंड दाबुन तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर बलात्कार केला. थोड्यावेळाने घरातील सर्व जागे झाल्यानंतर पिडीत मुलीने हि सर्व हकिगत तिच्या आईला सांगीतली. परंतू यावेळी या नराधम पित्याने सर्वांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली व घडलेला प्रकार कोणाला सांगू नये असा दम दिला. मात्र या बलात्कारातुन सदर मुलीला दिवस गेले. सातवा महिना लागल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. याप्रकरणी 14/02/2018 रोजी याप्रकरणी नराधम पित्याविरुध्द फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी दोषारोप दाखल झाल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधिक आर.आर. कदम यांच्यापुढे हा खटला उभा राहिला. सरकारी पक्षातर्फे सतरा साक्षीदार तपासण्यात आले. सदर केसमध्ये पिडीता व तिचे आईने आरोपीच्या बाजूने फितूर होऊन साक्ष दिली. परंतू सदर केसमध्ये आरोपी वडीलांपासून मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे एका मुलाला जन्म दिला. परंतू बाळाची पुरेसी वाढ न झाल्याने ते दगावले. दरम्यान सदर बाळाचे पालकत्व सिध्द करण्यासाठी तत्कालिन तपासी अधिकारी सहा.पो.नि. कादरी यांनी बाळाचे हाडाचे डि.एन.ए. चाचणी केली. हा डीएनए सदर आरोपीशी जुळल्याने आरोपी हाच त्या बाळाचा पालक असल्याचे सिध्द झाले. तसेच पिडीतीने सुरुवातीला आरोपी पित्याविरुध्द बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता त्यामुळे पिताच हा आरोपी असल्याचे सिध्द झाले.
सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा रुग्णालयाचे डॉ. खटके, डॉ. भरसाकडे, डॉ. उज्ज्वला शिरसाट यांची साक्ष मोलाची ठरली. न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरुन तसेच सरकारी वकील अॅड. बी.जी. कोल्हे यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला दोषी ठरविले. आरोपीस 376 नुसार दहा वर्ष कारावास, 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्या अतिरिक्त एक वर्षाचा कारावास तसेच बाल लैंगीक अत्याचार कलम 4 खाली दहा वर्ष कारावास 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्या अतिरिक्त एक वर्षाचा कारावास तसेच कलम 5एन सह 6 नुसार दहा वर्ष कारावास 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्या अतिरिक्त एक वर्षाचा कारावास वरील सर्व शिक्षा या आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत. आरोपीला या संपूर्ण प्रकरणात एकूण 60 हजार रुपये दंउ करण्यात आला असून यातील चाळीस हजार रुपये पिडीतेला देण्यात येणार आहे. असा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश मनाठकर यांनी दिला.
सदर केसचे कामकाज सरकारी अभियोक्ता अॅड. बी.जी. कोल्हे यांनी पाहिले त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, सारीका डोंगरे, सहा.फौ. सुनील सरोदे, पो.हे.कॉ. प्रवीण डावरे, पोहेकॉ चंद्रकांत तोरवेकर, कॉन्स्टेबल दिपाली दवंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.