अखेर मराठी भाषेचे सीमोल्लंघन
छत्रपती महाराज शिवाजी अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ, त्यांची गनिमी कावा युद्धनीती, परराष्ट्र आणि व्यापार धोरण इत्यादी विषय शिकवले जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी, तर पुढील आर्थिक वर्षात सात कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस असून त्याची परवानगी मिळाल्यास वर्षभरात या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दिल्लीतील प्रतिष्ठीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र सरकार भरघोस मदत करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. जेएनयूमध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू व्हावे, यासाठी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह अनेक जण गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, पुढील वर्षांमध्ये हे काम रखडले होते. अखेर 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संरक्षण व मराठा इतिहास अभ्यास केंद्रासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला. आ. सत्यजीत तांबे यांनी 7 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तातडीने कार्यवाहीची विनंती केली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2024 रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत त्यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडला.
यासंदर्भात नाशिकचे मूळचे आणि दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले. अखेर या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दिल्ली येथे मराठी भाषा अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठा इतिहास अभ्यास केंद्राचा शुभारंभ या महिन्यात होणार आहे. जेएनयू सारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात मराठी भाषा व इतिहास अभ्यास केंद्र सुरू होणे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याचे आ. तांबे यांनी नमूद केले. ‘जेएनयू’च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित आणि छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीजचे अध्यक्ष व अधिष्ठाता प्रा. अमिताभ भट्टयांच्याशी या अध्यासनाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.