अतिक्रमण काढतांना मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ

दोघांवर गुन्हा दाखल

सदर जागेवरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी स्थानिक नागरीकांनीच केलेली होती. तसेच सदर अतिक्रमण हटविण्याकामी स्थानिक नागरीकच पालिका प्रशासनाला सहकार्य करीत होते. मात्र यावेळी अतिक्रमण धारकाने मुख्याधिकारी यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या अंगावर कागद फेकले. तसेच शिवीगाळ व धमकीची भाषा वापरली. वास्तविक असा प्रकार अनेक ठिकाणी अतिक्रमण काढताना घडत असतो. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर पालिका मुख्याधिकार्‍यांना मारहाण झाली, एका समाजाचा मुख्याधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला असे फेक मेसेज पाठवून व त्याला रिप्लाय देत अनेकांनी टोकाची भाषा वापरत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक घटना समजून न घेता फक्त द्वेषातून सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पडत असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेकडे देखील पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
संगमनेर शहरातील लखमीपूरा येथील मशिदीच्या विश्‍वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करुन त्यावर दुकाने थाटली. हे अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांसह अतिक्रमण विरोधी पथकाशी यातील दोघांनी वाद घालीत त्यांना शिवीगाळ व धमक्या देण्यास सुरुवात केली. यावेळी शेख रफीक एजाजुद्दीन उर्फ रफीक सुन्नी याने हातातील कागदांचा गठ्ठा मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर भिरकावला. यावेळी त्याने ‘तुझे देख लूंगा, मैं फिरसें यही दुकान लगाऊंगा..’ अशी धमकी दिली. या प्रकाराने याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शेख रफीक एजाजुद्दीन उर्फ रफीक सुन्नी व सारिज एजाज शेख उर्फ सर्‍या (रा.लखमीपुरा) अशा दोघांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना काल गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास लखमीपूरा या परिसरात घडली. या ठिकाणी लखमीपुरा पंच ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मुस्ताक बेग व इतर भोगवटादारांनी पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा परस्पर शेख रफिक इजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी याला भाड्याने दिली. सुन्नी याने या जागेत ‘इंडिया पाटा गॅरेज’ नावाने दुकान थाटले. याबाबत परिसरातील फैज रहमतुल्ला यांच्यासह 24 नागरिकांनी सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्याबाबत पालिकेकडे निवेदन दिले होते. त्यामुळे पालिकेने लखमीपूरा पंच ट्रस्ट व संबंधित भोगवटादार रफिक सुन्नी यांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते. मात्र वेळोवेळी सांगूनही दोघांनीही आपले अतिक्रमण काढले नाही.
त्यामुळे अखेर 5 डिसेंबर रोजी संगमनेर नगरपालिकेने अंतिम नोटीस बजावताना संबंधित अतिक्रमणधारकाला शेवटची संधी दिली. मात्र त्यानंतरही त्याच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर 12 डिसेंबर रोजी पालिकेच्या पथकाने सदर जागेवर जाऊन शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी याला 24 तासात स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली. त्याने त्यालाही प्रतिसाद दिला नाहीच, उलट दुसर्‍या दिवशी त्याने सदरील जागेला बॅरिकेटिंग केले व तेथे धार्मिक झेंडा फडका त्याला जातीय रंग लावला. दरम्यान मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते व सहाय्यक नगररचनाकार शुभम देसले यांनी काल गुरूवारी दुपारी पालिकेच्या जेसीबीसह सदरील अतिक्रमणावर कारवाई सुरु केली.
तत्पूर्वी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संबंधित अतिक्रमण धारकाला त्या जागेतील त्याच्या चीजवस्तू व अन्य सामान काढून घेण्यासाठी आवश्यक वेळही दिला होता. त्यानुसार तेथून सामान हलविल्यानंतर काही क्षणातच रफिक शेख याने अचानकपणे आपल्या हातातील कागदपत्रे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दिशेने भिरकावत त्यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी त्याने मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ करीत ‘तुझे देख लूंगा. अशी धमकी दिली. यावेळी दुसरा आरोपी सारिक शेख उर्फ सर्‍या याने पालिकेच्या जेसीबी चालकासह अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकार्‍यांना शिवीगाळ व धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र या सर्वांनी त्याला भीक घातली नाही व आपली कारवाई सुरूच ठेवली.
याप्रकरणी सायंकाळी उशिराने मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी रफिक एजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी व सारीक एजाज शेख उर्फ सर्‍या या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धमकी दिल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून सदरच्या प्रकाराबद्दल जनमानसात मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सर्वच स्थरातून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख