एलसीबीची धडक कारवाई, 8.68 लाखांचा मुद्देमाल जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरात अवैध कत्तलखाने बंद असल्याचा पोलिसांचा वारंवार दावा फोल ठरत असून, प्रत्यक्षात हे कत्तलखाने पुन्हा पुन्हा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईचे आश्वासन दिले जात असतानाही, प्रत्यक्षात हप्तेखोरीच्या आरोपांमुळे स्थानिक पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.

याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने संगमनेर शहरातील भारतनगर परिसरात अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 8 लाख 68 हजार रुपये किमतीचे गोवंश मांस आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले. या धाडसी कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एलसीबी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारतनगर येथे अजमत लतिफ कुरेशी व त्याचे साथीदार घराजवळ पत्र्याच्या आडोशाला गोवंशाची कत्तल करत आहेत. माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. छाप्यावेळी आरोपी एका छोट्या टेम्पोमध्ये कत्तल केलेले गोमांस भरत असताना आढळून आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून फरार झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे निजम अय्याज कुरेशी (वय 21, रा. मदिनानगर), निसार रहेमान कुरेशी (वय 30, रा. मदिनानगर), मोसीन असलम कुरेशी (वय 25, रा. कादरीनगर) तर पुढील आरोपी फरार झाले आहेत यात अजमत लतिफ कुरेशी (भारतनगर), कासिफ अनवर कुरेशी (मदिनानगर) यांचा समावेश आहे.

या कारू पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे. 1,050 किलो गोमांस (किंमत: 3,15,000), पिकअप वाहन (5,50,000), दोन लोखंडी टोचे, चार चाकू, तीन काणस, इलेक्ट्रिक वजन काटा, असा एकूण मुद्देमाल किंमत: 8,68,000 या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 271/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) तसेच प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीच्या या कारवाईमुळे संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती असूनही अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणे, हे स्थानिक पातळीवरील निष्काळजीपणा किंवा संगनमत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिकांकडून आता ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात असून, कत्तलखाने कायमस्वरूपी बंद होणार का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





















