दलित वस्तीतील महिलांचा ग्रामपंचायतीवर हांडा मोर्चा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील दलित वस्तीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हांडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वस्तीत दर चार ते पाच दिवसांनी केवळ काही वेळासाठीच पाणीपुरवठा केला जात आहे. या अपुर्या पाण्यामुळे पिण्याची तसेच दैनंदिन वापराची गरजही भागत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी हातात हांडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. जोपर्यंत नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आंदोलनादरम्यान ग्रामसेवकांशी चर्चा करण्यात आली असून, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजय मंतोडे यांनीही प्रशासनाला इशारा देत सांगितले की, ठराविक कालावधीत पाणीपुरवठा नियमित न झाल्यास सर्व समाजाला एकत्र घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे शिबलापूरमधील पाणी प्रश्न आता अधिकच गंभीर बनला असून, प्रशासन या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे ग्रामीण भागात मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना, शिबलापूरमधील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व मूलभूत गरजांसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आधीच बाहेर उन्हाच्या झळा त्यात पाण्याचा दुष्काळ यामुळे महिलांना कामधाम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.






















