सुकेवाडी-घुलेवाडी परिसरात अपघात

0
47

कंटेनर घरात घुसला; वृद्ध महिला गंभीर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी-घुलेवाडी शिवारात आज सकाळी एक भीषण अपघात घडून एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिक-अहिल्यानगर बायपासवरील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 17-6847 क्रमांकाचा रिकामा कंटेनर घुलेवाडीच्या दिशेने येत होता. मात्र चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा कंटेनर रस्त्यालगत असलेल्या पपईच्या शेतात घुसला. पुढे जाताना कंटेनरने शेतातील घराची भिंत तोडून थेट घरात प्रवेश केला.

यावेळी घरासमोर बसलेल्या सत्यभामाबाई सातपुते (वय अंदाजे 65 वर्षे) या अचानक कंटेनरच्या खाली सापडल्या. त्यांच्या हातावरून कंटेनर गेल्याने हात गंभीर जखमी होऊन निकामी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत महिलेला कंटेनरखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या परिसरातून वाळू तस्करी, मुरूम वाहतूक करणारी तसेच ओव्हरलोड ट्रक मोठ्या वेगाने धावत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण आणणे, ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करणे आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. अन्यथा भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here