अंनिस आशा गाठी फोडण्याचे काम करणार – अॅड. रंजना गवांदे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – चमत्कारांच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणार्या भोंदूगिरीला संगमनेरात अखेर लगाम बसला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्त धाम सरकार’चे साम्राज्य पोलिसांनी रविवारी सील करत प्रमुख आरोपी राजेंद्र गडगे याला अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेविरोधातील लढ्याला नवे बळ मिळाले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात ही कारवाई केली. अंधश्रद्धेच्या आडून चालणार्या या भोंदूगिरीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी आश्रम परिसराची सखोल तपासणी केली. पुरावे नष्ट होऊ नयेत आणि तपासात अडथळा येऊ नये यासाठी ‘दत्त धाम’ला टाळे ठोकण्यात आले आहे.


धर्म व श्रद्धेच्या नावाखाली अंधविश्वास पसरवणारे लोक हे समाजासाठी ‘कॅन्सरच्या गाठी’प्रमाणे आहेत, अशा तीव्र शब्दांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रतिक्रिया दिली. अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या तथाकथित बाबाकडून आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारचा त्रास सहन केलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन अॅड. रंजना गवांदे यांनी केले आहे. विज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असा संदेशही त्यांनी दिला.
या कारवाईवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे उपस्थित होत्या. तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक शलमोन सातपुते, विकास काळे, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कारवाईपूर्वी शनिवारी रात्री पोलिसांनी गडगे याला सुकेवाडी रोडवरील ‘मिरा हॉटेल’ येथे नेऊन तपास केला. या ठिकाणी काही महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या गोपनीय ठेवण्यात आला असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर खंडणीचे आरोप झाल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळेच ही कारवाई शक्य झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे केवळ एका भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला नसून समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. ही कारवाई केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित नसून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.





















