स्वच्छ शहरासाठी नागरिकांना आवाहन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहराच्या झपाट्याने वाढणार्या विकासाला स्वच्छतेची जोड देत संगमनेर नगर परिषदेकडून मालदाडरोड परिसरात आज सोमवारी सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक सौरभ कासार, अर्चना दिघे यांच्यासह अधिकारी व स्वच्छता कर्मचार्यांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग घेतला.

संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आ. सत्यजीत तांबे यांनी शहराच्या विकासात स्वच्छता आणि अतिक्रमण मुक्त रस्ते याला प्राधान्य दिले होते. पालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वसनाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने एकएक पाऊल उचलले आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांत मालदाड रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असून निवासी वसाहतींसह विविध उद्योग-व्यवसायांनी येथे बहर घेतला आहे. सुरुवातीला अरुंद असलेला हा रस्ता नगरपालिकेने दुहेरी करून हायमास्ट लाईट्ससह विकसित केल्यामुळे या भागाला नवे रूप प्राप्त झाले. मात्र वाढत्या वर्दळीबरोबर काही ठिकाणी अतिक्रमण, कचर्याचे ढिगारे आणि काटेरी झुडपांमुळे परिसराचे सौंदर्य मलिन झाले होते.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक सौरभ कासार, अर्चना दिघे यांच्या पुढाकारातून नगर परिषदेकडून व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. सोमवारी सकाळीच आ. सत्यजीत तांबे व नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, मुख्याधिकारी व स्वच्छता कर्मचार्यांचे पथक मालदाड रोड परिसरात दाखल झाले. या अभियानात जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणातील कचरा हटविणे, झाडाझुडपांची साफसफाई आणि अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले. काही तासांतच परिसराचा चेहरामोहरा बदलून पुन्हा एकदा मालदाड रोड स्वच्छ, सुटसुटीत आणि आकर्षक बनला. परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी असून नगरपालीका आपले कर्तव्य पार पाडणारच आहे. परंतू नागरीकांनी देखील आपला परिसर स्वच्छ रहावा, कचरा घंटा गाडीतच टाकावा, रस्त्यावर अतिक्रमण करू नये असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशा प्रकारची नियमित स्वच्छता व देखभाल शहरातील विविध भागात झाली, अतिक्रमण करणार्यांवर कारवाई झाली तर शहराचा विकास अधिक प्रभावी ठरेल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





















