भोंदू गडगे गजाआड; नरबळी, जादुटोणाचे कलम

0
11

अंनिसच्या फिर्यादीवरून गुन्हा, आश्रमात वीजचोरी – 20 लाखांचा दंड

तपासात येणार धक्कादायक खुलासे

भोंदू गडगेने फोनवरून दिली युवावार्ताला बदनामीचा दावा दाखल करण्याची धमकी

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिकमधील ‘खरात बाबा’ प्रकरणाने राज्य हादरले असतानाच, संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करत कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्राने बरे करतो, मुल नसणार्‍या महिलांना मुल देतो, घरातील सर्व समस्यांचा निपटारा करतो, ओम शिव… म्हणत पैसे घेऊन अनेक समस्या सोडविण्याचा दावा करणार्‍या भोंदू ‘गडगे बाबा’ उर्फ राजेंद्र बापू गडगे याचा पर्दाफाश झाला असून त्याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे यांना अटक केली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.


तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे याने ‘दत्तधाम सरकार’ नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, निःसंतान महिलांना मूल प्राप्त करून देणे, तसेच विविध कौटुंबिक समस्या सोडवण्याचे खोटे दावे करत नागरिकांची दिशाभूल केली. या दाव्यांवर विश्वास ठेवणार्‍या नागरिकांकडून 11 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, दैवी शक्ती असल्याचा आव आणून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. विविध आजारांवर उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचे औषध देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते. या औषधांमुळे अनेकांना शारीरिक त्रास सहन करावा लागल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून गरजू आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यात तथाकथित या भोंदू बाबा विरूद्ध अनेक तक्रारी पुढे आल्यानंतर याबात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मोहिम छेडली. प्रांताधिकार्‍यांना, पोलीसांना निवेदन दिले. त्यामुळे भोंदू बाबा आणि अंनिस यांच्यात संघर्ष निर्माण झाला. त्यातून 12 एप्रिल रोजी अंनिसच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांना बाबाचे सहकारी मधुकर शिंदे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे यांनी वारंवार फोन करून आपण मिटींग करू असे सांगितले. ज्ञानेश्वरी गडगे यांच्यासह या लोकांनी गवांदे यांच्या घरासमोर उभे राहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी याबाबत पोलीसांना माहिती देऊन त्यांना पिटाळून लावले. अ‍ॅड. गवांदे व अंनिस या कोणत्याही प्रकारे दाद देत नसल्याने या भोंदूने तंत्रज्ञानाचा वापर करत बोगस व्हिडीओ तयार केला. त्यात अंनिस, पोलीस आपल्याकडे खंडणीद्वारे लाखो रूपयांची मागणी करत असल्याचा दावा केला. आणि हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर पसरवून अ‍ॅड. गवांदे व अंनिसची बदनामी केली.

महिला, नागरीक यांच्या अज्ञान व अडचणींचा गैरफायदा घेत या भोंदूबाबाने नागरीकांची प्रचंड आर्थिक लुट करून मानसिक छळ केला. त्याच्या मंत्रातून कोणताही फरक पडला नसतांना देखील पुढील उपचार म्हणून मोठी रक्कम उकाळण्यात आली. त्याच्याच युट्यूबच्या माध्यमातून अजब दाव्यांचे गजब व्हिडीओ प्रसारीत करून गरजूंना त्याच्याकडे अकर्षित केले. आणि हा दत्तधामचा दरबार मोठ्या प्रमाणावर विस्तारला. मात्र खरात प्रकरणानंतर आणि या भोंदूच्या काही कारणाम्यानंतर हळूहळू त्याचे पितळ उघडे पडू लागले. त्यातच अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यात लक्ष घातल्याने बाबाचा हा विस्तरलेला बाजार अखेर उठला. मात्र स्वत:चे पाप झाकण्यासाठी त्याने अंनिसवर गंभीर आरोप केले. आणि त्यामुळे या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव तथा वकील रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र गडगे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (रा. वडगावपान) तसेच सुरज शिंदे व मधुकर शिंदे (रा. रहीमपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करत आहेत.
वीजचोरीचाही भांडाफोड – भोेेंदू गडगे हा केवळ भक्तांचीच लुट करीत नव्हता तर कही शासकीय अधिकार्‍यांना हताशी धरून सरकारचीही लुट करीत होता. वडगाव पानमध्ये केलेले अवैध बांधकामे, कोणतेही परवाने नसतांना सुरू केलेेले हॉटेल, मेडीकल आणि आश्रमासाठी लागणारी वीज देखील त्याने फुकटात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता आश्रमात वीजमीटर बायपास करून अनधिकृतपणे वीज वापर होत असल्याचे आढळले. या वीजचोरीद्वारे एअर कंडिशनर, बोअरवेल आणि लाइटिंगसह सुमारे 7 किलोवॅट भार वापरला जात होता. याप्रकरणी महावितरण कंपनीने या दत्तधाम आश्रमावर 20 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित मीटर बंद करण्यात आले असून दोषींना बिल भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही वीज चोरी किती दिवसांपासून सुरू होती याची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदिप वट्टमवार यांनी सांगितले.


‘खरात बाबा’नंतर ‘गडगे बाबा’- नाशिकमधील ‘खरात बाबा’ चे अनेक कारनामे रोजच्या रोज उघड होत आहे. खरात सध्या जेलमध्ये असून त्याचे सहकारी मात्र बाहेर आहे. त्याच्या ट्रस्टवर विश्वस्त असणारे जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीचा शुक्रवारी अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघाती मृत्यू आहे की घातपात यावर आता चर्चा होत आहे. खरात याच्या जीवालाही धोका असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजत असतांना आता संगमनेरातील ‘गडगे बाबा’ प्रकरण उघड झाल्याने राज्यात भोंदू बाबांविरोधात संताप व्यक्त होत आहे. धर्माच्या, अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here