कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह परिक्षण मंडाळाने केली ‘रिंगाण’ ची निवड

‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी जाहीर झाला. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वातही घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणार्‍या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उध्वस्त होत जातो. या विस्थापितांच्या दु:खांची तीव्रता या कादंबरीतून वाचकांपर्यत पोहोचवली आहे.

डॉ. खेडलेकर यांची परिक्षक मंडळातील निवड अभिमानास्पद
मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कारासाठी परिक्षक समितीत येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संतोष खेडलेकर यांचा समावेश होता. परिक्षक मंडळातील त्यांची निवड ही संगमनेरकरांच्या दृष्टीने खरोखर अभिनंदनीय व अभिमानास्पद आहे. डॉ. खेडलेकर यांचे लेखन, वाचनाचा व्यासंग मोठा आहे. त्याचे हे फलित आहे. अत्यंत जबाबदारीपूर्वक त्यांच्या समितीने केलेली निवड निर्विवादच असणार यात शंका नाही. संगमनेरकर वाचक व रसिकांकडून आपले डॉ. खेडलेकर व कृष्णात खोत यांचे हार्दिक अभिनंदन. माजी प्राचार्य मुकुंद डांगे, संगमनेर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणार्‍या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रवींद्र सभागृहात वर्ष 2023 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.
कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.
कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (2005), ‘रौंदाळा’ (2008), ‘झड-झिंबड’ (2012), ‘धूळमाती’ (2014), ‘रिंगाण’ (2018) या त्यांच्या प्रकाशित कादंबर्‍या असून, या कादंबर्‍यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

परिक्षक मंडळ व पारितोषिक

श्री.अभिराम भडकमकर, डॉ. संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी कमानी ऑडिटोरियम येथील आयोजित कार्यक्रमात होणार असल्याची माहिती सचिव के. श्रीनिवासराव यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख