चौघांविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यात पठार भागातील घारगावमध्ये गर्दी जमली म्हणून पाहायला गेलेल्या दोन तरुणांना काही तरुणांनी तुम्ही भिलटे लई माजला का? तुम्ही इथे थांबायचे नाही, घारगाव मधील सगळे भिलटे संपून टाकू. तुम्ही आमच्या पक्षाचे विरोधात काम करताय असे बोलून लाथाबुक्क्याने दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना काल बुधवारी दि. 20 रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चौघांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश संपत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश आणि त्याचा मित्र किरण हे बोटा गावाकडून घारगाव मध्ये आले असता तिथे गर्दी जमलेली दिसली. कसली गर्दी आहे म्हणून पहायला गेले असता निलेश अशोक आहेर, संकेत रमेश आहेर, विकास बाळू मते आणि अनिल बबन डोके हे त्या जमावात उपस्थित होते. त्यातील निलेश आहेर मुकेशच्या जवळ येऊन तुम्ही भिलटे लई माजला आहात, तुम्हाला लय माज आला का? तुम्ही इथे थांबायचे नाही. तुम्ही सगळे भिलटे घारगावमधून संपून टाकू, तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात काम करताय काय? असे बोलून लाथा बुक्क्याने मारहाण केली.
त्यानंतर सोबत असलेला मित्रालाही लाथाबुक्याने मारहाण करून तू लई भिल्लांच्या पोरांना एकत्र करून आमचे विरोधात काम करतात काय? असे बोलून गचांडी पकडली त्यावेळी मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन कुठेतरी गहाळ झाली. त्यानंतर मित्राने तिथून पळ काढला असता त्यातील काही लोक तुमच्याकडे बघून घेतो, सगळ्या भिल्लांना इथून मारहाण करून काढून देईल असे बोलून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरील चौघांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.