पत्रकारांच्या प्रश्नांविषयी आ. सत्यजित तांबे यांचा विधानपरिषदेत आवाज

0
1509

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई यांच्या मागण्यांची दखल

आ. तांबे यांच्या प्रश्‍नाची दखल घेत सभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी सांगितले की, मागील अधिवेशनात मंत्री शंभुराजे देसाई  यांना या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सदर अहवाल आल्यानंतर त्याबाबत अधिक गांभीर्याने विचार होईल. तसेच डिजीटल पत्रकारीतेसंदर्भात माहिती संचालनालय आणि विविध पत्रकार संघटनांकडून सुचना मागवून धोरण ठरविण्यात येईल. तसेच सदर विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असल्याने जानेवारी महिन्यात याबाबात बैठक घेऊन अर्थसंकल्पात योग्य ती तरतूद करण्यासाटी लक्ष घालण्याच्या सुचना यावेळी सभापतींनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना केली. पाटील यांनी देखील त्याला होकार देत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सभापतींनी याबाबत समाधान व्यक्त केले. आमदार सत्यजीत तांबे यांच्यामुळे  पत्रकारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून त्यांचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत.


नागपूर /संगमनेर- राज्यातील संपादक, पत्रकारांच्या प्रश्‍नांवर शासन दरबारी सातत्याने आवाज उठविणार्‍या व त्यासाठी सतत पाठपुरावा करणार्‍या संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची भेट घेऊन पत्रकारांच्या समस्या मांडल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजीत तांबे यांनी या मागणीची विशेष दखल घेत विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून पत्रकारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. विधान परिषद सभापती निलम गोर्‍हे यांनी या प्रश्‍नांची नोंद घेऊन कार्यवाही करण्याचे सरकारला सुचित केले. याबद्दल संघटनेचे राज्य अध्यक्ष संपादक किसन भाऊ हासे व सर्व पदाधिकार्‍यांच्यावतीने आ. सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन करण्यात आले.


संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई ही राज्यव्यापी संघटना असून संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे यांच्या नेतृत्वाखाली मध्यम व छोट्या वृत्तपत्रांवर शासनाकडून वेगवेगळ्या मार्गांनी होणार्‍या अडचणींविरुद्ध आवाज उठविला जातो. भांडवली वृत्तपत्रांना शासकीय जाहिरात देताना नेहमी झुकते माप दिले जाते. मात्र ग्रामीण भागातील वृत्तपत्रांची जाहिरात बरोबरच इतर सेवा सुविधांबाबत गळचेपी होते. शासनाच्या विविध समित्यांवर ग्रामीण भागातील संस्था प्रतिनिधींना  डावलले जाते. जाहीरात दरवाढ, पेन्शनसह अधिस्वीकृतीचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष किसन भाऊ हासे व उपाध्यक्ष नरेंद्र लचके यांच्यासह पत्रकारांच्या मागण्यांसदर्भात मंत्री, लोकप्रतीनिधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत संघटनेच्या नावासह संदर्भ देत पत्रकारांसाठी महामंंंडळ असले पाहिजे. डिजीटल माध्यमांमधली पत्रकारांसाठी नियमावली असली पाहिजे. पत्रकारांसाठी आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच   सन्मान मानधन असले पाहिजे अशी मागणी केली. प्रलंबीत मागण्यांसदर्भात पत्रकारांच्या विविध संघटनांच्यावतीने सातत्याने सरकारकडे म्हणणे मांडले जाते. इतरांना न्याय मिळवून देणारा पत्रकार मात्र स्वत:च्या मागण्यांसदर्भात वारंवार शासन दरबारी हेलपाटे मारत असतो. याची शासनाने दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने सर्व पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलवून पत्रकारांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागावे अशी सुचना सभापती निलम गोर्‍हे यांनी केली.  
दरम्यान संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई ही संघटना ग्रामिण भागातील वृत्तपत्रांसाठी नेहमी आवाज बुलंद करत आहे. 28 मे 2023 रोजी राज्य संपादक परिषदेच्या भाषणात आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांसदर्भात मी विधीमंडळात  मांडील असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना शासन दरबारी वाचा फोडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here