माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान
युवावार्ता – संगमनेर (प्रतिनिधी) जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ लातूर येथील दयानंद सभागृहात नुकताच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे तर प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी मंत्री अमित देशमुख उपस्थित होते .
तालुक्यातील जवळे कडलग येथील मात्र सद्यस्थितीत पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग यांनी आठ हजार ८४९ मीटर उंच असलेले जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे तर सामाजिक क्षेत्रात ऋषिकेश मोंढे यांनी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
युवा उद्योजक व रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे हे साई आशीर्वाद इंडस्ट्रीजचे संचालक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. रोटरी क्लब संगमनेरच्या माध्यमातून त्यांनी कोविड पश्चात पार्श्वभूमीवर संगमनेर अकोले तालुक्यातील ३७ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शालेय अभ्यासक्रम असलेले एक कोटी रुपयाचे ६६५ टॅब वितरित केले आहेत. कोरोना महामारी मध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या १११ महिलांना आटा चक्की व ६१ महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. अंधत्व मुक्त समाज निर्मितीसाठी उपवर गरजू व गरीब मुलामुलींच्या ७१ तिरळेपणा निर्मूलन शस्त्रक्रिया रोटरी आय केअर ट्रस्ट संगमनेरच्या माध्यमातून केल्या आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी सक्षमपणे उभा राहण्यासाठी नांदूर खंदरमाळ येथे ५०० केशर आंबा, वड , चिंच यांचे तर जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एक एकर जागेत अधिक उत्पादन देणाऱ्या चिंचेची लागवड करून चिंचबन उभे केले आहे.कोरोना आपत्तीमुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोंढे यांनी दिलेल्या योगदानाची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे. गिर्यारोहक सुविधा कडलग व ऋषिकेश मोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.