डाॅ. मालपाणी म्हणजे नानाविध पैलु असणारे व्यक्तीमत्व
प्रसंग पहिला– संगमनेरला पहिल्यांदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘ जाणता राजा ‘ हे महानाट्य आणलं होतं. स्वतः बाबासाहेब पूर्णवेळ संगमनेरला उपस्थित होते. एक माझे छायाचित्रकार मित्र प्रसाद सुतार यांनी मी व आदरणीय बाबासाहेब बोलत असताना आमच्या गप्पा चित्रित करायला सुरुवात केली. गप्पांच्या शेवटी मी त्यांना संगमनेरच्या आयोजनाबद्दल एक प्रश्न विचारला. यावर बाबासाहेब उतरले, ‘ तुम्हाला सांगतो मला जर असे पाच सहा संजयराव मिळाले तर तामिळ, तेलगू, गुजराती, हिंदी इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये जाणता राजा घेऊन जाण्याचं स्वप्न नक्कीच साकार होईल ‘
प्रसंग दुसरा – एका कुटुंबात पाल्याने कॉलेजात कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा यावर एकमत होत नव्हतं, आईवडील मुलांसह संजूभाऊंकडे आले. त्यांनी पालकांना बाहेर बसवून मुलाशी दहा मिनिटे गप्पा मारल्या ( हो गप्पाच, कौन्सिलिंग वगैरे नाही) मुलगा हसत बाहेर आला आणि त्याच्या करियरची दिशा ठरली होती. ज्या प्रश्नावरून घरात आठ पंधरा दिवस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तो प्रश्न चुटकीसरशी सुटला. आणि हो हे पालक किंवा विद्यार्थी यांचा संजय मालपाणी या व्यक्तीत्वाचा त्यापूर्वी काहीही संबंध नव्हता, साधा परिचय देखील नव्हता.
प्रसंग तिसरा- संध्याकाळचे सात साडेसात वाजले आहेत, संगमनेरच बालकुमार साहित्य संमेलन संपलय. संजूभाऊ स्टेजवर कुणाशीतरी बोलत उभे आहेत तितक्यात माझा पाच वर्षांचा नातू (पुतण्याचा मुलगा) त्याला अचानक काहीतरी सुचले म्हणून स्टेजवर जातो. संजुभाऊंना तुम्ही माझ्याशी कुस्ती खेळणार का ? असं म्हणतो आणि संजुभाऊ आपले वय, पद, प्रतिष्ठा याचा विचार न करता हो म्हणतात आणि त्याच्याबरोबर छानपैकी कुस्ती खेळतात, लहान मुलाला जिंकल्याचा आनंद देण्यासाठी हरल्याचे छानपैकी नाटकही करतात.
हे तीन प्रातिनिधिक प्रसंग आहेत. या प्रत्येक प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. एकच व्यक्ती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कसं काम करते हे सांगायला ही उदाहरणे पुरेशी आहेत. सौ शहरी एक संगमनेरी हे वाक्य कधीपासून अस्तित्वात आले हे माहित नाही पण प्रत्येक पिढीतला संगमनेरकर मात्र या वाक्याशी भावनात्मकरित्या जोडला गेलेला आहे. कारण प्रत्येकाच्या आसपास अशी चार दोन व्यक्तिमत्वे असतात ज्यांच्याकडे बघून असे म्हणावे वाटते, अशा लोकांपैकी एक म्हणजे संजुभाऊ…
आमचे दोघांचे व्यावसायिक करियर एकाच वर्षी म्हणजे १९९१ ला सुरु झाले. तेव्हापासून या व्यक्तिमत्वाला अतिशय जवळून बघतो आहे, अनुभवतो आहे. काही लोकांच्या व्यक्तीमत्वात एक जादू असते, उर्जेचा स्त्रोत असतो…. डॉ संजय मालपाणी या व्यक्तीमत्वात असे असंख्य गुण आहेत. परंतु अनेकांकडे अभावाने आढळणारा प्रयोगशीलतेचा गुण, सतत नाविन्याचा ध्यास असलेले मन आणि मेंदू, अभ्यासू वृत्ती या गोष्टींमुळे या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने झळाळी लाभली आहे.
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातील असंख्य प्रयोग आणि सोबत केले आहे. ज्याकाळी तंबाखूच्या मार्केटिंग क्षेत्रात काय प्रयोग करता येणार अशी मानसिकता घेऊन इतर उद्योजक वावरायचे त्याकाळात पारंपरिक पद्धतीबरोबरच अतिशय नाविन्यापूर्ण आणि आधुनिक गोष्टी करण्यात डॉ. संजयजी मालपाणी पुढे होते. जगाच्या पुढे चालेल तोच जगाच्या स्पर्धेत टिकेल हे सूत्र कायम डोक्यात ठेवले तर हमखास यश मिळतेच. जगातला अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी व्यवस्थापन या विषयावर असंख्य पुस्तके लिहिली आहेत पण डॉ संजय मालपाणी यांनी त्यांच्या अनुभवाचे पुस्तक लिहिले तर ती भारतातीलच काय तर जगातल्या व्यवस्थापकीय जगताला अनमोल भेट ठरेल.
व्यावसायिक व्यवस्थापन असो, शैक्षणिक क्षेत्रातील व्यवस्थापन असो, धार्मिक –आध्यात्मिक क्षेत्रातील व्यवस्थापन असो किंवा मानवी मनाचे व्यवस्थापन असो या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांची खास मुद्रा उमटवली आहे.
मालपाणी परिवाराला व्यावसायिक क्षेत्रात उतरून एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे मात्र एक ‘ब्रँड’ म्हणून व्यावसायिक वाटचाल करताना हे वर्ष म्हणजे २०२३ हे मालपाणी उद्योग समूहाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ७५ वर्षांच्या या कालखंडात असंख्य आव्हानांना तोंड देत उद्योग समूहाने यशस्वी वाटचाल केली आहे. या वाटचालीत मागच्या तीन दशकात मार्केटिंग क्षेत्रात उद्योग समूहाने जे जे प्रयोग केले त्यातील बहुतांशी उपक्रमांची संकल्पना, नेतृत्व हे डॉ. संजय मालपाणी यांचे आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार असो, व्यवसाय वृद्धी असो या तीन दशकात उद्योग समूहाचा जो प्रवास झाला तो आजवरच्या वाटचालीतील सर्वाधिक वेगवान होता.
हा व्यावसायिक प्रवास सुरु असताना त्यांनी इतरही अनेक क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सर्वोत्तम म्हणावे असे काम केले. श्री. ओंकारनाथजी मालपाणी आणि स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेला गीता परिवार आज महाराष्ट्र आणि देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहचलाय. या साडेतीन दशकात जगाच्या बदलाचा वेगही सर्वाधिक होता. सर्वच क्षेत्रात स्थित्यंतरे झाली मात्र गीता परिवार आजही जगभरातील लोकांना आपला वाटतो यात डॉ. संजय मालपाणी यांनी काळानुरूप केलेले बदल, उपक्रमातील नाविन्य या गोष्टी कारणीभूत आहेत.
ध्रुव ही इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे तर डॉ. संजय मालपाणी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आज या शाळेचा लौकिक सर्वदूर पोहचला आहे. संगमनेरबरोबरच चोखंदळ, चौकस, चिकित्सक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांनीही ध्रुवच्या गुणवत्तेला मान्यता दिली आहे.
मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवले पाहिजे या ध्यासातून ध्रुवमध्ये वेगवेगळे क्रीडाप्रकार हाताळले जातात. ध्रुवच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळत राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे यामागे डॉ. संजय मालपाणी यांचीच दूरदृष्टी कारणीभूत आहे हे कुणीही नाकारणार नाही. ‘योगासन’ हे खेळ आहे आणि त्याचा समावेश राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारात झाला पाहिजे यासाठी संपूर्ण देशातून सर्वाधिक प्रयत्न जर कुणी केले असतील तर ते डॉ. संजय मालपाणी यांनीच. सरकारी पातळीवरील अधिकारी मंडळींची खेळाबद्दलची अनास्था सर्वश्रुत आहे मात्र अशा असंख्य मानवी अनास्थेच्या अडथळ्यांना तोंड देत ते योगासनांचा प्रचार प्रसार करीत आहेत.
संगमनेरच्या शैक्षणिक परंपरेतील मानाचे पान म्हणून ओळख असलेल्या संगमनेर महाविद्यालयात देखील त्यांनी आपल्या कल्पकता आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे चालण्याच्या स्वभावामुळे असंख्य प्रयोग केले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातच यशस्वी होऊ शकतो असा समज असलेला कैझेन हा व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग राज्यात खचितच एखादया महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने यशस्वी करून दाखविला असेल पण डॉ. संजय मालपाणी यांनी हे करून दाखवलं.
अर्थात हे सगळं करताना त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे असलेले राजेशजी, मनीषजी, गिरीशजी, आशिषजी ही भावंडे आणि या पिढीचे नवे शिलेदार जय, यश आणि हर्ष यांची साथही तितकीच महत्वाची आहे.
आज डॉ. संजय मालपाणी यांचा वाढदिवस… त्यांच्यासोबत काम करताना तीन दशकांचा काळ पुढे सरकला आहे. या तीन दशकांच्या सरलेल्या पर्वाकडे मागे वळून बघतांना एक गोष्ट मनापासून सांगावी वाटते की त्यांच्या ५४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ‘आपणासी जे जे ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन’ या उक्तीप्रमाणे इतरांनाही संपन्न आणि समृद्ध केले आहे. अशा या संपन्न… समृद्ध आणि परिपूर्ण व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
डॉ. संतोष खेडलेकर,
कार्याध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर
मोबा. -9822097809